रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-
रायगड जिल्ह्यासह राज्य आणि देशभरात मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सर्वत्रच नवरात्रोत्सव साजरा होतोय. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या सुधागड तालुक्यातील पाली येथील ओसवाल प्लाझा मध्ये एकमेव श्री संतोषी मातेचे मंदिर उभारले आहे. शकुंतला मोहन ओसवाल यांनी तब्बल 20 वर्ष उपवास आणि तप असे मोठ्या भक्तिभावाने श्री संतोषी मातेचे नियमित व्रत केले, त्यातूनच मंदिर उभारणीच्या कामात उद्योजक मोहन ओसवाल यांना यश आले असल्याचे बोलले जातेय. सण 2013 सालापासून नवरात्रोउत्सवाची सुरवात झाली. पालीतील याच ओसवाल प्लाझा मध्ये घट स्थापनेपासून नवरात्रोत्सवाची मोठी धूम पहावयास मिळतेय, श्री संतोषी माता मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरण दिसून येतेय. या मंदिरात अतिशय सुंदर व रेखीव देवीची मूर्ती विराजमान असून या देवीचा महिमा अपार असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात, या मंदिरात दैनंदिन पूजा पाठ, आरती, प्रसाद व रात्री नवरात्रोत्सवानिमित्त नृत्य दांडिया गरबा असे कार्यक्रम पार पडतायेत. लहान, थोर , तरुण आबालवृद्ध सारेच मोठ्या उत्साहाने या सणात सहभागी होताना दिसत आहेत. याठिकाणी विविध सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, संगीत खुर्ची, होम मिनिस्टर, पैठणी असे कार्यक्रम पार पडतात. महिलांना गरबा नृत्यात सहभागी होता यावे यासाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आलीय. एकूणच नवरात्रोत्सवात सारेजण एकत्र येतात, यानिमित्त एकता बंधुत्व आणि मैत्रिभाव जपला जातोय. सारे गुण्यागोविंदाने आणि सुखाने एकोप्याने राहावेत, सर्वांना सुख वैभव आणि मांगल्य लाभावे अशीच प्रार्थना श्री संतोषी माता यांच्या चरणी भाविक भक्तगण नागरिक करीत आहेत…