अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):
ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कामकाज गतिमान व पारदर्शक व्हावे,यासाठी देश पातळीवर संस्थांचे संगणकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे… त्यानुसार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठ्या उत्साहाने संस्थाचे संगणकीकरणाचे काम सक्षमपणे पुर्ण केले. हे उपक्रम राबविणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील एकमेव बँक ठरली असून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली कामगिरी खऱ्या अर्थाने कौतूकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे चेअरमन शाजी के.व्ही यांनी काढले. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्ती सोहळा शुक्रवारी( दि.11) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे सीजीएम संजयकुमार गुप्ता, सीजीएम रश्मी दराड, लेखापरिक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधवर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार किशोर दराडे, माजी आमदार दत्तात्रेय सावंत, नाबार्डचे जनरल मॅनेजर प्रदिप पराते, जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे, प्रदिप अपसुंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, संस्थाचे ज्येष्ठ पदाधिकारी शंकरराव म्हात्रे, ठाणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार गोंधळी, आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, कमळ नागरी सहकारी पतंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपूळे, कामरान शेख, इमरान अन्सारी, बँकेच सर्व संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग व बँकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे तर आभार बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी व्यक्त केले.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचा संगणकीकरण कार्यपुर्तीचा सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यामध्ये सर्वांचे योगदान मोलाचे राहिले आहे. सहकारी संस्थासह बँकेतील कर्मचारी यांनीदेखील प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे आजचा हा दिवस रायगडसह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सन्मानाचा आहे. बँक वेगळ्या उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचाऱ्यांचेदेखील आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.