नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
५५ वर्षाच्या काळात सिडकोने पहिल्यांदाच निविदेद्वारे विक्रीस काढलेल्या तब्बल ४२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला सुमारे २ हजार १२५ कोटी इतकी विक्रमी किंमत प्राप्त झाली आहे. सिडकोच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आकाराचा भूखंड ई लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात आला होता. खारघर सेक्टर २३ येथील हा भूखंड खरेदी करणारी विकासक कंपनी आकार एस्ट्रॉन यांनी हा भूखंड खरेदी करण्याकरिता प्रति चौरस मीटर ५ लाख ६ हजार १ रुपये इतकी बोली लावली होती.
सिडकोतर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे भूखंड विक्रीची प्रक्रिया राबविली जात असल्याने सिडकोच्या उत्पन्नात अधिक भर पडत आहे. नुकतेच सिडकोने भूखंड विक्री योजना ४६ अंतर्गत निवासी, वाणिज्यिक, बंगला, सेवा उद्योग आणि स्टोरेज व वेअरहाऊस वापराकरिता विविध ठिकाणचे एकूण ३० भूखंड विक्रीस काढले होते. त्यापैकी २९ भूखंडांना ई लिलावद्वारे प्राप्त झालेल्या बोली सिडकोने गत १७ ऑक्टोबर २०२५ रोजी घोषित केल्या होता…
मात्र, खारघर सेक्टर,२३ येथील भूखंड क्रमांक ८ या ४१९९४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला प्राप्त झालेल्या बोली सिडकोने घोषित केल्या नाही. त्यामुळे सिडको अधिकारी राजकीय दबावापोटी काही ठराविक विकासकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ई लिलाव निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या काही निविदाकारांकडून केला जात होता. तर या भूखंडाच्या लिलाव प्रक्रियेला आणखी मुदतवाढ द्यावी जेणेकरून इच्छुक विकासकांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे, याकरिता सिडको अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे देखील आरोप झाले. परंतु सिडको अधिकाऱ्यांनी या एका भूखंडाच्या निविदा प्रक्रियेस मुदतवाढ दिली नसली, तरी सदर भूखंडाला प्राप्त झालेल्या बोली देखील इतके दिवस उघडल्या नव्हत्या.
त्यामुळे या निविदेत सहभागी झालेले विकासक आकार ऍस्ट्रॉन यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सदर भूखंडाच्या बोली उघडण्याचे आदेश सिडकोला द्यावेत अशी मागणी केली. सोमवारी व मंगळवारी या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सिडको अधिकाऱ्यांनी निविदा दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाइन प्रक्रियेत काही अडथळे आल्यामुळे इच्छुक निविदाकार या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत, तसे काही विकासकांचे ई-मेल प्राप्त झाल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी न्यायालय स सांगितले. सिडकोच्या भूखंडांना चांगली किंमत प्राप्त व्हावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचे देखील त्यांचे म्हणणे होते.
अखेर न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानंतर तसेच काही विकासकांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन निविदा उघडण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. सदर प्रकारावर मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच बुधवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असतानाही सिडको अधिकाऱ्यांनी कार्यालयात जाऊन सदरची प्रलंबित निविदा उघडण्यात धन्यता मानली.
खारघरच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या भूखंडाला अखेर सिडकोला प्रति चौरस मीटरचा प्राप्त झालेला दर सिडकोच्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. या एका भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत २१२५ कोटी रुपये जमा होणार आहेत.या भूखंडाला बोली लावणाऱ्या पहिल्या तीन बांधकाम विकासकांमध्ये मोठी चुरस झाल्याचे दिसून येत आहे. या भूखंडाला द्वितीय क्रमांकाची बोली लावणारे नोबल ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी ५ लाख ५ हजार १ रुपये प्रति चौरस मीटर ची बोली लावली होती. तर लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांनी ५ लाख १ रुपयाची प्रति चौरस मीटर बोली लावली होती. या भूखंडासाठी ई लीलाव निविदा प्रक्रियेत एकूण ८ निविदाधारक सहभागी झाले होते. तरी देखील सिडको या भूखंडाच्या बोली घोषित करत नसल्याने सिडकोच्या कार्यपद्धतीवर संशयाची पाल चुकचुकत होती.
विशेष म्हणजे खारघर येथील या भूखंडासाठी सर्वोच्च बोली सादर करणाऱ्या पहिल्या तीन निविदाधारकांनी निविदा सादर करण्याच्या अगदी शेवटच्या मिनिटाला तेही शेवटच्या ३० सेकंद मध्ये आपल्या बोली सादर केल्याचे दिसून येत आहे. त्यातही नोबल ऑरगॅनिक यांनी शेवटचे १० सेकंद व आकार ऍस्ट्रॉन यांनी शेवटचे चार सेकंद शिल्लक असताना ऑनलाइन बोली सादर केल्याचे ऑक्शन रिपोर्टवरून दिसून येत आहे.

