पेणमध्ये राजकीय रणसंग्राम भाजप–राष्ट्रवादी युतीवर संभ्रम,कार्यकर्ते गोंधळले… पेण नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी चुरस वाढली…

0
17

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकारण तापले आहे… तीन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीत आता सत्तेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती, पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) त्यांच्या गटात आल्याने भाजपमध्येच नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे. त्यामुळे पेणमध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीवर संभ्रमाचे ढग दाटले आहेत. शहरात शिवसेना (शिंदे गट) फारसे प्रभावी नसल्याने हा गट बाजूलाच पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’च्या नावाने १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून ते या निवडणुकीत दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्तेही त्यांच्या संपर्कात आहेत.

महायुतीतही सध्या गोंधळाचे वातावरण आहे.नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण लागू असल्याने भाजपकडून प्रीतम पाटील आणि राष्ट्रवादीकडून वसुधा पाटील या दोघींची नावे समोर आली आहेत. त्यामुळे महायुतीतील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरसेवक पदांसाठी तब्बल २२ अर्ज आले आहेत. प्रत्येक प्रभागातून उमेदवार तयार असल्याने राष्ट्रवादीही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी पूर्ण तयारीत आहे.पेण नगरपरिषदेच्या रणांगणात आता त्रीकोनी लढत रंगण्याची चिन्हं दिसत आहेत… भाजप, राष्ट्रवादी आणि ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’ यांच्यातील या संघर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.