Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडबळीराजावर परतीच्या पावसाचे संकट... परतीच्या पावसाने लावला शेतकऱ्यांच्या जीवाला घोर...

बळीराजावर परतीच्या पावसाचे संकट… परतीच्या पावसाने लावला शेतकऱ्यांच्या जीवाला घोर…

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

राज्यभरात परतीचा पाऊस धो-धो कोसळतोय. या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे…गेले काही दिवस आणि काल सायंकाळी धुंवाधार पावसाने थैमान घातल्याने हाता तोंडाशी आलेले भात पिक पाण्यात तरंगत असून त्याची कापणी चिखलात केली जात आहे…काल सायंकाळी धुंवाधार पावसाने थैमान घातले असून जोरदार वारा आणि कडाडणारी वीज याने रात्री उशिरापर्यंत भितीचे वातावरण निर्माण झाले होते…त्यातच विज पुरवठा खंडित झाल्याने जोरदार पावसात अंधाराचे साम्राज्य पसरले होते…परतीच्या पावसाने खालापूर तालुक्यातील अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत…गेली चार, पाच दिवस सायंकाळची हजेरी लावून पाऊस जात आहे… वावंढळ,चौक,हातनोली,भिलवले,पाली,आसरे, जांभीवली, कलोते, विणेगाव, कांढरोली, धारनी, तुपगाव या गावांच्या बरोबर तालुक्यातील शेतकरी संकटात आहे…सतत पडणाऱ्या पावसात देखील भात पिक चांगले बहरले होते…यंदा चांगले पिक आहे…या आनंदात असतानाच परतीच्या पावसाने जोरदार थैमान घातले आणि उभे पीक शेतकरी याच्या डोळ्यासमोर आडवे झाले..लावणीसाठी शेतात चिखल केला जातो, तसा चिखल आता शेतात आहे, त्याच चिखलात शेतकरी भात कापणी करताना आजचे विदारक चित्र चौक परीसरात दिसत आहे. अनेक शेतकरी यांनी शेतात भरलेले पाणी खाली करण्यासाठी पाट केले आहेत, जवळपास सर्वच भात पिकात चिखल असल्याने हे भात कापून सुकत तरी कुठे घालायचे ?असाही प्रश्न निर्माण झाला आहे…मुंबई- पुणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांनी भात रस्त्याच्या कडेला ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रगत शेतकरी आणि इस्रायल रिटर्न शेतकरी हरीश पाटील यांनी केली आहे.
तात्काळ शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी सांगितले. खालापूर तालुक्यात १९६ हेक्टर भात पिक आणि इतर पिकांचे नुकसानी चा प्राथमिक अंदाज आहे,असे खालापूर तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांनी प्रतिनिधीशी भ्रमण ध्वनी वरून सांगितले.विधान सभा निवडणुक जाहिर झाली असल्याने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी निवडणुक कामात व्यस्त असेल तरी त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकरी यांचे पंचनामे तातडीने करावे अशी मागणी शेतकरी प्रदीप गोंधळी आणि रामदास काईनकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments