समालख्यात निरंकारी सामूहिक विवाह सोहळा संपन्न… १२६ नवयुगलांनी घेतले सतगुरुंचे आशीर्वाद…

0
3

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

समालखा (हरियाणा) येथील निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर त्याच पवित्र मैदानावर सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन उपस्थितीत साधेपणाने निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नवविवाहित जोडप्यांनी परिणय सूत्रात अडकून आपल्या नवजीवनाची मंगलमय सुरुवात करण्यासाठी सतगुरुंच्या हस्ते शुभ आशीर्वाद प्राप्त केला. हा सोहळा अत्यंत अनुपम आणि प्रेरणादायी ठरला,जिथे भारतातील बिहार, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह ऑस्ट्रेलिया व कॅनडा येथूनही नवविवाहित जोडपी सहभागी झाली. एकूण १२६ नवयुगलांनी या पवित्र विवाह सोहळ्यात सहभाग नोंदविला. या शुभ प्रसंगी सर्व १२६ वर-वधूंनी एकाच स्थळी एकत्व आणि साधेपणाचा सुंदर संदेश देत परिणय सूत्रात अडकले. मिशनचे वरिष्ठ अधिकारी,वर-वधूंचे कुटुंबीय तसेच असंख्य श्रद्धाळू भक्तगण या दैवी आणि भावनिक क्षणाचे साक्षीदार ठरले.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक जयमाला व निरंकारी परंपरेतील विशेष सांझा-हार विधीने झाली. त्यानंतर भक्तिमय वातावरणात हिंदी भाषेत निरंकारी लावा गायल्या गेल्या. प्रत्येक लावेमध्ये नवविवाहितांना अध्यात्मिक संदेश आणि गृहस्थ जीवनातील कल्याणकारी शिक्षांचे सुंदर मार्गदर्शन देण्यात आले. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांनी नवविवाहित जोडप्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना सुखी, आनंदमय आणि समर्पित वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद दिला.दरवर्षीप्रमाणे यंदाचाही हा सोहळा साधेपणा, समरसता आणि एकत्वाच्या दैवी संदेशाने उजळून निघाला. या आयोजनातून जात, धर्म, भाषा आणि प्रांतीय भेदभावापलीकडे जाऊन मानवतेचे सुंदर आणि प्रेरणादायी स्वरूप प्रकट झाले. सतगुरु माता जींनी सांगितले की, आजचा हा पवित्र दिवस नवविवाहित जोडप्यांसाठी नवजीवनाची सुरुवात आहे. विवाह हा फक्त एक दिवसाचा उत्सव नसून, प्रेम, सन्मान आणि सहकार्याने बांधलेले पवित्र नाते आहे. विवाहित जीवनात दोघांनी एकमेकांना साथ देत, समानतेने आणि समजुतीने पुढे जाणे आवश्यक आहे.त्या पुढे म्हणाल्या, विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांचा पवित्र संगम आहे. या मिलनातून सेवा, सत्संग, सुमिरण आणि भक्ति या मूल्यांचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे.शेवटी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी नवविवाहितांना शुभाशिर्वाद देत प्रार्थना केली की, “निरंकार प्रभूची असीम कृपा तुमच्यावर सदैव राहो, आणि हा पवित्र मिलन आनंद, प्रेम व सौहार्दाचा प्रतीक ठरो.” संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा जी यांनी माहिती देताना सांगितले की, समाज कल्याण विभागाच्या सहकार्याने यावर्षी एकूण १२६ जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला असून, यात भारतातील विविध राज्यांसोबतच परदेशातील जोडप्यांचाही समावेश आहे.