रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्याने आता निवडणूक वातावरण रंगू लागले आहे.त्यातच रोहा नगरपालिकेचे राजकारणही तापायला लागले आहे.काहीच दिवस बाकी असल्याने उमेदवारांची हालचाल, चर्चासत्रं, गाठीभेटी यांना वेग आला आहे.
रोहा ही खासदार सुनील तटकरे यांची जन्मभूमी असल्याने या नगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काही वर्षांपासून निवडणूक झाली नव्हती, त्यामुळे यावेळी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही, याचा निर्णय पक्षनेतृत्वासाठी कठीण ठरणार आहे. त्यातच आमदार महेंद्र दळवी यांनी रोह्याकडे लक्ष दिल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.
यावेळी नगराध्यक्ष पद ओबीसी महिला आरक्षित असल्याने पुरुष इच्छुकांची डोकेदुखी कमी झाली आहे. सध्या वनश्री शेडगे, शिल्पा धोत्रे आणि पूजा पोटफोडे या तिघींची नावे चर्चेत आहेत. काही नगरसेवक आपापल्या पत्नींसाठीही उमेदवारी मागणार असल्याचे बोलले जात आहे.समीर शेडगे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्षासाठी जोरदार कामाला सुरुवात केली आहे. ते पूर्वी राष्ट्रवादीतच होते आणि शहरातील अनेक समाजांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी आपल्या उच्चशिक्षित मुली वनश्री शेडगे हिला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
दुसरीकडे शिल्पा धोत्रे या पक्षाशी एकनिष्ठ असून, त्यांचे नावही आघाडीवर आहे. तर पूजा पोटफोडे या माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या पत्नी असून, तटकरेंच्या स्नेहवर्तुळात आहेत. त्यामुळे तटकरे नेमका कोणता निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.राज्यस्तरावर व्यस्त असलेले सुनील तटकरे मात्र उमेदवारीवर फार वेळ न घालवता लवकर निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.एकूणच, रोह्यातील निवडणुकीची हवा आता पूर्णपणे गरम झाली आहे.

