श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स ( आनंद जोशी) :-
हल्लीच्या काळात सायबर लाॅचे ज्ञान आवश्यक झाले आहे… म्हणूनच समजेल तेवढाच मोबाईलचा वापर करावा असे उद्गार श्रीवर्धनचे न्यायाधीश न्या.ए.एस.साटोटे यांनी काढले… दि.23 रोजी श्रीवर्धन न्यायालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते… ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण देण्यासाठी कायदा बनवावा लागतो ही शोकांतिका आहे, असेही ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले… ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या कायदेविषयक शिबिरात ॲड.विठोबा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्यांबद्दल सविस्तर
मार्गदर्शन केले… ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत असे सांगून त्यांनी ज्येष्ठांसाठी असलेल्या 2007 च्या कायद्यातील तरतुदी सांगितल्या… तसेच ज्येष्ठ नागरिकांविषयी आस्था निर्माण व्हावी, म्हणून ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो असे सांगितले… शिबिरामध्ये ॲड.संतोष सापते यांनी सायबर
सिक्युरिटीबद्दल मार्गदर्शन करताना सायबर गुन्ह्यांची वेगवेगळी उदाहरणे सांगून मोबाईलचा वापर अतिशय सावधपणे करणे आवश्यक आहे असे निदर्शनास आणले… शिबिरात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नरेश पुलेकर, उपाध्यक्ष नारायण पांढरकामे यांनीही विचार मांडले… शिबिरास ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.इसाने,ॲड.वढावकर, ॲड.वावेकर, ॲड.ठोसर, ॲड.लाड व अन्य वकील वर्गही उपस्थित होते… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.तांबुटकर यांनी केले…