खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खालापूर,खोपोली पोलिस दल अलर्ट झाले असून खोपोली शिळफाटा येथे नाकाबंदी (चेकपोस्ट) करण्यात आली आहे…निवडणुकीच्या काळात अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य, शस्त्रे यांचा तालुक्यात पुरवठा होण्याची शक्यता गृहीत धरून संशयित वाहनांची 24 तास तपासणी केली जात आहे…यासाठी पोलिसांचे ३ कर्मचारी, महसूलचे २ कर्मचारी तर एक कॅमेरामैन दिवस व रात्री तैनात करण्यात आले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच तालुक्यातून येणाऱ्या दुचाकी,कार, टेम्पो, बस यासह वाहनांची व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट करीत चतुराईने गाड्यांची तपासणी केली जात आहे…
विधानसभा निवडणुकीची १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून २५ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे…या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुक्यात पोलिस अलर्ट झाले आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त वातावरणात, निष्पक्ष,शांततापूर्ण आणि प्रलोभनमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्याच्या रस्ते आणि सागरी सीमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच अवैध मार्गांने होणाऱ्या दारू वाहतुकीवर देखील करडी नजर ठेवण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता…
निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्निशस्त्रे यांवर विशेष लक्ष असणार आहे. पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी, गस्त घालून व विशेष मोहिम राबवून जास्तीत जास्त करवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी सर्व प्रभारी अधिकार्यांना दिले असल्याचे सूत्रांकडून समजते.