महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. १ येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणाचा मान मा. श्री. संदीपजी जाधव, उपनगराध्यक्ष तथा सभापती शिक्षण व नियोजन विकास समिती, महाड नगरपरिषद यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी, महाड व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, बालमित्र मंडळ ‘पेठेचा राजा’चे सर्व पदाधिकारी, शाळा क्र. १ व शाळा क्र. २ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शाळा क्र. १ व शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांनी संगीत कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. शिस्तबद्ध पद्धतीने सादर केलेल्या या कवायतीने उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले. तसेच कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच ‘असाक्षर मुक्त भारत’ ही शपथ सर्व उपस्थितांनी घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी बालमित्र मंडळ ‘पेठेचा राजा’ व महाड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साही व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

