रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
बेळगाव सीमाभागात रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या भव्य ‘मराठी सन्मान यात्रे’ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस) युवक आघाडीच्या वतीने रविवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे धर्मशाळेत एक उत्साहपूर्ण सन्मान सोहळा पार पडला.
या सोहळ्यात बेळगावच्या मराठी अस्मितेच्या संघर्षाला सातत्याने शब्द देणारे, मूळचे संकेश्वर येथील ज्येष्ठ वृत्तपत्रकार स्व. विठ्ठलराव बाळू पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र तथा दै. बेळगांव वार्ताचे रायगड जिल्हा प्रतिनिधी, माणगाव (रायगड) येथील मूळ रहिवासी पत्रकार नरेश विठ्ठल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. मराठी अस्मितेच्या लढ्याला बळ देणाऱ्या निर्भीड व निःपक्षपाती पत्रकारितेचा हा सन्मान ठरला.
दै. बेळगांव वार्ता हे केवळ सीमाभागापुरते मर्यादित नसून महाराष्ट्र राज्यातही अत्यंत लोकप्रिय माध्यम म्हणून ओळखले जाते. बेळगाव सीमावादासह सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवरील विश्वसनीय, प्रत्यक्ष जमीनीवरून होणारे वृत्तांकन या दैनिकाने सातत्याने केले असून त्यामुळे महाराष्ट्रातील वाचकवर्गातही या वृत्तपत्राला मोठा विश्वास व लोकप्रियता लाभली आहे.
एमईएस युवक आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी मराठी सन्मान यात्रेसाठी ऊर्जा मिळावी, तसेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रायगड किल्ल्याची पवित्र माती संकलित करण्यासाठी दि. २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी रायगड येथे दाखल झाले होते.
या संपूर्ण दौऱ्यादरम्यान मराठी सन्मान यात्रेशी संबंधित सर्व घडामोडींचे सातत्यपूर्ण, निःपक्षपाती व प्रत्यक्ष जमीनीवरून वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार म्हणून नरेश पाटील यांचा एमईएस युवक आघाडीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नरेश पाटील यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. युवक आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके तसेच पदाधिकारी धनंजय पाटील यांनी नरेश पाटील यांच्या पत्रकारितेचे विशेष कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या निःपक्षपाती आणि सातत्यपूर्ण लेखणीमुळे बेळगाव सीमावादातील मराठी अस्मितेचा लढा अधिक ठामपणे जनतेसमोर पोहोचत आहे.
या सन्मान सोहळ्याला एमईएस युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच बेळगाव सीमाभागातून आलेले मोठ्या संख्येतील कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावकडे प्रस्थानपूर्व पार पडलेला हा सन्मान सोहळा मराठी अस्मितेच्या चळवळीत पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. खऱ्या अर्थाने बेळगावच्या मराठी संघर्षाला शब्द देणारे पत्रकार नरेश पाटील यांचा पाचाड येथे झालेला हा सन्मान मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण ठरला.

