महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाडच्या ऐतिहासिक न्यायालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राही साळवीने केलेल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांचे मन जिंकले. या न्यायालयाचे विशेष ऐतिहासिक महत्त्व म्हणजे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानतेची ज्योत प्रज्वलित केली त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथेच सत्याग्रहाद्वारे सर्वांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला होता. त्याच ठिकाणी आज एका आठ वर्षाच्या लहानग्या चिमुकलीने – राहीनं – देशाच्या ऐक्य, विकास आणि संविधान मूल्यांची भक्कम बाजू मांडली.
या विशेष प्रसंगी अॅड. गणेशजी कारंजकर आणि अॅड. संदीप सर्कले या दोघांनी राहीला व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळण्यासाठी विशेष मेहनत घेतली आणि तिचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळेच राहीला या ऐतिहासिक न्यायालयातील कार्यक्रमात भाषण करण्याची संधी प्राप्त झाली. या मोलाच्या योगदानाबद्दल राहीच्या कुटुंबियांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. राहीने आपल्या भाषणात 1950 पासून सुरू झालेल्या भारताच्या संविधानप्रवासाची उजळणी करत लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानाच्या मुख्य मूल्यांचा प्रभावी उल्लेख केला. गरीबी, बेरोजगारी आणि पर्यावरणीय प्रदूषण यांसारख्या आव्हानांवर एकत्रितपणे उपाय शोधण्याची नागरिकांची जबाबदारी तिनं प्रकर्षाने मांडली.लहानशा वयात एवढ्या धीराने, स्पष्ट उच्चाराने आणि राष्ट्रीय भावनेने केलेले हे भाषण पाहून न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती, वकील आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिचे कौतुक केले.
पोलिस विभागाकडून तात्काळ निमंत्रण:- राहीचे भाषण ऐकल्यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यातील पोलीसांनी तिला प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी म्हणून आमंत्रित केले.येथे तिने पोलीस निरीक्षक श्री.रमेश तडवी साहेब , सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि हवालदारांसमोर पुन्हा एकदा प्रभावी भाषण करत संविधान मूल्यांचे पालन आणि राष्ट्रनिर्माणातील नागरिकांची जबाबदारी अधोरेखित केली. तहसीलदार श्री. महेश शितोळे यांनी तिचे मनःपूर्वक कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले. पोलिसांच्या हस्ते तिला बक्षिसे, चॉकलेट्स आणि शाबासकीच्या थापा देण्यात आल्या.
चांदे क्रीडांगणातील मुख्य कार्यक्रमातही शानदार उपस्थिती यानंतर राहीला महाड शहरात दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या चांदे क्रीडांगण येथील मुख्य प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातही म्हणून मंचावर बोलण्याची संधी प्राप्त झाली.येथे महाडचे नगराध्यक्ष श्री. सुनील कविस्कर, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, डॉक्टर्स, पद्मश्री डॉ.बावसकर, नव- निर्वाचित नगरसेवक, व्यापारी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तिने दमदार भाषण केले.देशासमोरील आव्हाने, संविधान मूल्यांचे पालन आणि नागरिकांची कर्तव्यनिष्ठा यावर तिने स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण विचार मांडले. तिचे भाषण संपताच मैदानात उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात तिचे जबरदस्त स्वागत केले.
राही साळवी — महाडच्या भूमीतून उजळणारा नवा तेजोमय आवाज: एका दिवसात तीन वेगवेगळ्या व्यासपीठांवरून—ऐतिहासिक न्यायालय, महाड शहर पोलीस ठाणे आणि चांदे क्रीडांगण—राहीने केलेले सलग तीन भाषण म्हणजेच तिची पहिलीच मोठी ‘हॅटट्रिक’ ठरली. एका लहानग्या मुलीने केवळ आपल्या शब्दांनी राष्ट्रीय अभिमान, संविधान मूल्ये आणि सामाजिक भान या साऱ्यांना न्याय देत संपूर्ण महाडच्या मनावर छाप पाडली आहे.तिच्या ओजस्वी वक्तृत्वात भविष्यातील नेतृत्वाचे तेज जाणवत असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

