पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
निवडणूकीच्या काळात राज्यातील पोलिस यंत्रणा अर्लट झाली असून प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. राज्यात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात रोकड ऐन आचारसंहिता काळात कारवाई करून पोलिसांकडून जप्त केली जात असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील तथा मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभागाअंतर्गत आचारसंहिता पथकाने काल सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान वायूवेग पथक क्र. ०३ मोटार वाहन निरिक्षक दिलिप दराडे यांनी मुंबई पुणे हायवे रोडवरून खारघरकडून कळंबोलीकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टोयाटो इनोव्हा कारला अडवले. गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये २ लाखांची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम स्थिर सर्वेक्षण पथक क्र.१२ मार्फत जप्त करण्यात आली.
यापूर्वीसुद्धा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभागाअंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत भरारी पथकाने दोन दिवसापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येथील पळस्पे फाटा चेक नाका येथे रोडवरून जाणाऱ्या सुपर कॅरी टेम्पो सिल्व्हर रंगाची चारचाकी गाडीला थांबवून तपासणी केली. त्या गाडीमध्ये ३,४९,५०० रुपयांची रक्कम आढळून आली… सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम भरारी पथकामार्फत जप्त करण्यात आली. सदर कारवाई १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.