माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
गणेशोत्सवाची चाहूल लागल्यापासून कोकणभरात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये लहानमोठ्या गावांत आपले बाप्पा घरी आणण्यासाठी लाखो भाविक मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.त्यामुळे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्र -६६) वर शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ पासून यंदाच्या वर्षातील सर्वाधिक वाहनचळवळ नोंदवली गेली.
अतोनात गर्दी असूनसुद्धा पोलिस विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. आज तिसऱ्या सलग दिवशी हजारो वाहनांच्या सततच्या रेलचेलमध्येही मोठ्या अडथळ्याशिवाय वाहतूक सुरळीत पार पडत आहे.एकूण वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष खानविलकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यासाठी पोलीस व वाहतूक विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), प्रादेशिक परिवहन विभाग (RTO), महसूल विभाग, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, जिल्हा परिषद रायगड तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध विभागांचे एकत्रितपणे योगदान मिळाले आहे. NHAI कडून आवश्यक ती सर्व कामे जसे की सूचना फलक बसविणे, विद्युत प्रकाशयोजना करण्यासाठी फ्लडलाईट्स बसविणे, रस्ते वॉर्डन कर्मचारी नेमणे इत्यादी व्यवस्था करण्यात आल्या असून त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मोठी मदत झाली आहे.
वाहनांची गर्दी व कोंडी टाळण्यासाठी पायलट गाड्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याद्वारे आधी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना मार्ग दिला जातो, तर नंतर परतीच्या प्रवासासाठी वाहनांना वाव दिला जातो. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदतीसाठी महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. प्रवाशांनी १०३३ (NHAI आपत्कालीन हेल्पलाईन) किंवा महामार्ग सुरक्षा पोलिस/वाहतूक नियंत्रण कक्ष ९८३३४ ९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच माणगाव येथे एका पर्यायी रस्त्याची सोय करून ठेवण्यात आली आहे, जेणेकरून अचानक कोंडी झाल्यास वाहने त्वरीत वळवता येतील.
यंदाच्या वाहतूक व्यवस्थापनात विशेष म्हणजे अजूनपर्यंत एकही मोठा ट्रॅफिक जाम किंवा अडथळा नोंदवला गेलेला नाही.हा यशस्वी उपक्रम पोलिस विभागाच्या काटेकोर नियोजनाचा आणि कार्यपद्धतीचा उत्तम नमुना मानला जात आहे. “सर्व भाविकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे व आनंदात गणेशोत्सव साजरा करावा,” असे आवाहन खानविलकर यांनी केले.
दरम्यान, सोमवार, २५ ऑगस्ट रोजी प्रमुख तपासणी नाके व महामार्गांवर भेट दिल्यानंतर वार्ताहरांनी पाहिले की,दुपारच्या गर्दीच्या वेळी कुठेही कोंडी नव्हती आणि वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र, गणेश चतुर्थीचा मुख्य दिवस बुधवार, २७ ऑगस्ट रोजी असल्याने सोमवारी रात्रीपासून गर्दीचा शेवटचा टप्पा अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक दक्षता घेतली आहे.
यावर्षीच्या वाहतूक व्यवस्थापनाला भाविक व प्रवासी यांनी मनःपूर्वक दाद दिली असून, पोलिस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सर्व संबंधित यंत्रणांना हे खरेच “हॅट्स ऑफ” मानावे लागेल.