उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील ) :-
मच्छीमार बोटीत कोल्डस्टोरेजमधील टॅन्कमध्ये मासळी बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या दोन खलाशांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर चार खलाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उरण येथील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करंजा मच्छीमार बंदरातील शुक्रवार दि.८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे परिसरातील मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे. करंजा येथील मच्छीमार बंदरात शुक्रवारी (दि. 08) सकाळी गोरखनाथ नाखवा यांच्या मालकीची बोट खोल समुद्रातील मासेमारी करून परत आली होती. पकडलेली मासळी बंदरात उतरवून साडेबारा वाजताच्या सुमारास मासळीच्या लिलावाची तयारी सुरू होती. खोल समुद्रात मासेमारी करून पकडलेली मासळी टिकवून ठेवण्यासाठी मच्छीमार बोटीतच दोन टन क्षमतेचे कोल्डस्टोरेज खण तयार करून मासळी बर्फात साठवून ठेवतात. असे दोन टन क्षमतेचे प्रत्येक बोटीत 14 ते 17 खण तयार केलेले असतात. खणात साठवणूक करून ठेवण्यात आलेली मासळी लिलावासाठी बाहेर काढण्यासाठी प्रकाश किशोरकुमार गौतम (32) हा खलाशी खणात उतरला होता. मात्र, खणात आठ दिवसांपासून ठेवण्यात आलेल्या बर्फ आणि मासळीमुळे झालेल्या गॅसमुळे प्रकाश गुदमरून जागीच बेशुद्ध होऊन पडला. बेशुध्द अवस्थेत पडलेल्या खलाशाला काय झाले पाहाण्यासाठी अन्य सहकारी खलाशी शिवकुमार गौतम (26) खणात उतरला. तोही गुदमरून बेशुद्ध होऊन पडला. बराच वेळ झाला म्हणून या दोघांना पाहाण्यासाठी उतरलेले रामचंद्र भाऊ पाटील (43), मयुर चिमण वारठा (28), राजेंद्र परशुराम पाटील (41), समाधान विठोबा पाटील (42) हे सहा खलाशी गुदमरून बेशुद्ध होऊन पडले. अखेर धावाधाव करीत सहाही बेशुद्ध अवस्थेतील खलाशांना उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच प्रकाश गौतम व शिवकुमार गौतम यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला होता. तर रामचंद्र पाटील, मयुर वारठा, राजेंद्र परशुराम पाटील व समाधान विठोबा पाटील हे चार खलाशी अत्यावस्थ झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली, उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.