पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी ) :-
आगरी समाजातील महिला व मुलींबद्दल अपशब्द वापरणारे उरण मतदार संघातील उमेदवार महेश बालदी यांना या निवडणुकीत आगरी समाज आपला “आगरी हिसका” दाखविणार असल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी आज पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला…
यावेळी अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संघटनेचे खजिनदार पी.वाय.पाटील व पदाधिकारी उपस्थित होते… ‘मी तुमच्याकडे मत मागायला येतो; मुली मागायला येत नाही’ असे आगरी समाजातील महिला व मुलींबद्दल अपशब्द वापरणारे उरण मतदार संघातील उमेदवार महेश बालदी यांची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर अनेक दिवस व्हायरल होत आहे… त्याबद्दल त्यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागावी यासाठी चार नोव्हेंबरला बालदी यांना पत्र देखील दिले होते… मात्र त्यांनी आजपर्यंत समाजाची माफी मागितली नाही… आमच्या आया बहिणी, मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत समाजातील महिलांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही, असा इशारा देखील राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी यावेळी दिला…
तुम्ही आमच्या खाण्या-पिण्या वरून, आमच्या आगरी भाषेवरून हिणवत असाल तर आमचा आगरी समाज या निवडणुकीत तुम्हाला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही असेही म्हटले… समाजाला कमी लेखण्याबाबत तुम्ही माफी मागितली नाही तर तुम्हाला आगरी हिसका नक्कीच दाखवतील… आगरी समाजातील काही लोकं स्वतः च्या फायद्यासाठी अशा उमेदवारांच्या पाठीशी आहेत अशा लोकांना माझं आवाहन आहे की स्वतःच्या फायद्यासाठी अजिबात लाचारी पत्करू नये, असे आवाहन देखील अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी यावेळी केले…