अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग तालुक्यातील कोळगांव येथील गट नं. ४४४/१/२, क्षेत्रफळ १-००-२३ हे.आर. चौ.मी. वर भाटिया नावाच्या उद्योगपतीने अनधिकृत उत्खनन व बांधकामाला सुरुवात केल्याने मोठा वाद उफाळून आला आहे. सी.आर.झेड. क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे उत्खनन, मातीचा भराव किंवा बांधकामाला मज्जाव असूनही, येथे राजरोसपणे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. स्थानिक कार्यकर्ते प्रशांत थळे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असून, महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आधीच सी.आर.झेड.मधील बांधकामावर संपूर्ण बंदी घातली आहे. अलिबाग तालुक्यातील आवास, किहीम, सासवणे, कोळगांव व रहाटले या गावांमधील अवैध बांधकामे जमिनदोस्त करण्यात आलेली आहेत. तरीदेखील, कोळगांवमधील सध्याचे बांधकाम महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय सुरू होणे शक्य नाही, असा संशय व्यक्त होत आहे.