रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मोहोपाडा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या गणरायाचे आगमन होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असताना, नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठ गजबजवून टाकली आहे. बाजारपेठेत कृत्रिम फुले, हार, शोभिवंत लाइटिंग, मकर तसेच विविध प्रकारच्या गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. भक्तांनी आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट आणि मूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मोहोपाड्यातील मुख्य रस्ते व मोकळी बाजारपेठ खरेदीदारांनी फुलून गेली आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी गणेशोत्सव लक्षात घेऊन आकर्षक सजावटीची साधने व मूर्तींची विक्री सुरू केली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीभाव आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.