उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात येणाऱ्या नवी मुंबई नजीकच्या उरण,पनवेल आणि खोपोली या तिन्ही औद्याोगिक व वाढत्या नागरिक परिसरातील प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एनएमएमटी बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सिडकोच्या माध्यमातून विकसित होणारे उरण आणि पनवेल हे दोन्ही तालुके मुळात नवी मुंबईच्या विस्तार आणि विकासाचाच एक भाग आहेत. यातील पनवेल विभागात काही प्रमाणात एनएमएमटी बस सेवेच्या बससेस काही मार्गावर धावत आहेत. मात्र सध्या पनवेल मधील मुंबई गोवा व मुंबई पुणे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यावर व मुंबईला जोडणाऱ्या अटलसेतू लगतच्या पळस्पे,नांदगाव विभागात मोठमोठे नागरी प्रकल्प उभे राहू लागले आहेत. या हजारो घरांच्या वस्तीकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.भविष्यात याच विभागात अनेक घरांचे प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यामुळे येथील नागरी वस्तीला दळणवळणाची सुविधा आवश्यक आहे. तर दुसरीकडे उरण पनवेल तालुक्याच्या मध्यावर सद्या नवी मुंबई विमानतळ बाधितांना जमिनीच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या २२.५ टक्के भूखंडावरील पुष्पक नगराची निर्मिती सुरू आहे. या नव्याने निर्माण होणाऱ्या वस्तीला ही एनएमएमटीची बस सेवा सुरू झाल्यास प्रवासी संख्येने वाढ होऊ शकते. या मार्गावर पनवेल- करंजाडे ते पुष्पक नगर या मार्गावर सेवा सुरू केल्यास नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रवाशांना ही याचा लाभ घेता येईल.