रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जल वाहतुकीसाठी विविध संस्थांना परवानगी देण्यात आलेली आहे. या संस्थामार्फत ज्या प्रवासी बोटी कार्यरत आहेत त्यांची तांत्रिक आणि प्रवाशी सुरक्षा अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.नियमानुसार तरतूद नसणाऱ्या बोटीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी निर्देश दिले आहेत.गेटवे मुंबई येथील बोट अपघाताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील ज्या ज्या प्रवाशी बोटींना परवाना देण्यात आला आहे, त्या बोटींची इनलॅण्ड व्हेसल अॅक्ट, 1917 मधील व परवाना देतानाच्या नियमावलीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत…याची तपासणी मेरिटाईम बोर्डकडून करण्यात येत आहे… अनधिकृत व मंजूर प्रवाशी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करित असलेल्या बोटींवर तातडीने नियमोचित कारवाई करण्यात येणार आहे…
प्रत्येक जेट्टीवर बोटीमध्ये किती प्रवासी आहेत, याची नोंद संबंधितांनी ठेवावी असे आदेश दिले आहेत…तसेच प्रत्येक बोटीवर लाईफ जॅकेट, रिंग बोयाज, टॉर्च, प्रथमोपचार पेटी, फ्लोटींग रोप इ. सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे… बोटीवर प्रवेश करतानाच प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट व सुरक्षेच्या सूचनां देण्याबाबत संबंधित बोट/फेरी मालकांना देण्यात याव्यात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीवर चढणार नाहीत, याची नियमित तपासणी करण्यात यावी. ऑनबोर्ड तिकीट देण्यास प्रतिबंध करावा, जेणेकरुन प्रवासी संख्येवर नियंत्रण करणे शक्य होईल. सर्व प्रवासी बोटींची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या तज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करावी असे निर्देश देखील जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.