नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांना पसंती… हजारोंच्या संख्येने पर्यटक अलिबाग,नागाव,काशीद,मुरुडला

0
123

 अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

नाताळ आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष याचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगडमधील अलिबाग, दिवेआगार, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन किनारपट्टीवर दाखल झाल्याने समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. परिणामी हॉटेल, लॉज, खाद्यपदार्थांच्या दुकानांची चंगळ सुरू झाली आहे.अलिबाग नागाव काशीद मुरुड दिवेआगर हरिहरेश्वर या समुद्रकिनारी भागात पर्यटकांनी आतापासूनच येथील रिसॉर्ट आणि हॉटेल्स बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. गोव्याला होणारी गर्दी आणि जास्त होणारा खर्च वाचवण्याकरिता अगदी मुंबईच्या हाकेवर असणाऱ्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे येथील हॉटेल्स आणि रिसॉर्ट हाउसफुल झाल्याचे पाहायला मिळते… पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत आहे. बोट व्यावसायिक, स्टॉलधारक, नारळपाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत आहेत. इकडे मुरूडमध्येही राजापुरी येथील जंजिरा किल्ला पाहायला पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून स्थानिकांचे व्यवसाय तेजीत आहेत.