रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
दि. १० फेब्रुवारी २०२६ मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी अस्मितेच्या सातत्यपूर्ण संघर्षात शब्दांचे शस्त्र समर्थपणे पेलणारे ज्येष्ठ पत्रकार नरेश व्ही. पाटील, माणगाव–रायगड यांचा महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस) युवा समितीच्या वतीने जाहीर गौरव व अभिनंदन करण्यात आले.
गेल्या काही आठवड्यांपासून ‘मराठी सन्मान यात्रा’ संदर्भात सातत्याने, सखोल व प्रभावी माध्यम कव्हरेज देत मराठी जनभावना व्यापक स्तरावर पोहोचविल्याबद्दल एमईएस युवा समितीच्या बैठकीत हा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी बेळगांव शहरात मराठा मंदिर येते सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत समितीच्या सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी सभे वेळी विशेष अभिनंदन ठराव मांडला असून, तो सर्व उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजूर केला.
हा सभा विशेष महत्त्वाचा ठरतो कारण येत्या दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभमुहूर्तावर, एमईएसच्या दीर्घकालीन संघर्षाचे प्रतीक असलेल्या येळ्ळूर येथून ‘मराठी सन्मान यात्रा’ सुरू होणार आहे.
पत्रकारितेची परंपरा, मराठी अस्मितेची नाळ पत्रकार नरेश पाटील हे सध्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील माणगाव शहराचे रहिवासी असून, गेल्या जवळपास चार दशकांपासून त्यांनी माणगावलाच आपले कर्मभूमी व घर मानले आहे. मूळचे ते सीमावादग्रस्त भागातील संकेश्वर (बेळगावपासून सुमारे ५० कि.मी.) येथील रहिवासी आहेत. मराठी अस्मितेच्या संघर्षाशी त्यांची नाळ त्यामुळे जन्मतःच जोडलेली आहे.
त्यांचे शिक्षण बेळगाव, खानापूर व मुंबई येथे झाले. पत्रकारिता ही त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नसून वारसा आहे. त्यांचे वडील कै. विठोबा (विठ्ठलराव) बाळू पाटील हे एक प्रख्यात पत्रकार होते. त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील मराठी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते. वडिलांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत नरेश पाटील यांनीही पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करत निष्ठावान व प्रामाणिक पत्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. पत्रकारितेसोबतच ते माणगाव येथे स्वतःचे एक इंग्रजी शैक्षणिक केंद्रही यशस्वीपणे चालवित आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, नरेश पाटील हे बेळगावातून प्रकाशित होणाऱ्या नामांकित मराठी वृत्तपत्रांचे प्रतिनिधी / वार्ताहर म्हणूनही कार्यरत असून, त्यामध्ये ‘स्वतंत्र प्रगती’, ‘दैनिक वार्ता’ व ‘दैनिक बेळगाव वार्ता’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे ते महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी समाज यांच्यातील एक प्रभावी माध्यम दुवा म्हणून कार्य करत आहेत.
रायगडाच्या प्रेरणेतून सीमाभागांपर्यंत पोहोचलेली गर्जना बैठकीदरम्यान एमईएस युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी विशेष उल्लेख करत सांगितले की, रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक प्रेरणेतून मराठी सन्मान यात्रेला मिळालेली ऊर्जा पत्रकार नरेश पाटील यांच्या लेखणीतून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचली.
महाड तालुक्यातील रायगड किल्ला आणि त्यालगतचा माणगाव तालुका—या भूमीतून प्रेरणा घेऊन निघालेल्या यात्रेचे रायगड जिल्ह्यासह बेळगावच्या सीमाभागातही मोठ्या प्रमाणावर माध्यम प्रतिबिंब निर्माण करण्यात त्यांच्या लेखनाचा मोलाचा वाटा आहे. एमईएस युवा समितीच्या या निवडक व संघर्षशील ‘मराठी सन्मान यात्रे’ला त्यांनी दिलेले माध्यम बळ उल्लेखनीय ठरले आहे.
कृतज्ञतेचा सन्मानचिन्ह प्रदान हेही स्मरणात आहे की, बेळगावकडे प्रस्थान करण्यापूर्वी, आपल्या लढ्याला रायगड किल्ल्याची आशीर्वादरूपी प्रेरणा मिळावी यासाठी गेलेल्या एमईएस युवा समितीच्या पथकाने, मोठ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दि. २६ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार नरेश पाटील यांचा ‘सन्मानचिन्ह’ देऊन गौरव केला होता.
हा सन्मान केवळ एका पत्रकाराचा गौरव नसून, मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेसाठी निष्ठेने उभ्या असलेल्या लेखणीचा सन्मान आहे. शब्दांची तलवार, लढ्याची धार एमईएस युवा समितीकडून करण्यात आलेला हा गौरव हे सिद्ध करतो की, संघर्षात केवळ घोषणा नव्हे, तर जबाबदार पत्रकारितेची लेखणीही तितकीच प्रभावी असते. नरेश पाटील यांचे कार्य हे मराठी भाषा व समाजसाठी प्रेरणा देणारे असून, “जेव्हा लेखणी एखाद्या कारणासाठी उभी राहते, तेव्हा इतिहास नोंद घेतो.”

