अमरावती मध्ये महिनाभरात चार बिबट्यांचा मृत्यू… पर्यावरण व जीव प्रेमींनी व्यक्त केली चिंता… 

0
35

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

अमरावती-नागपूर महामार्गावर रहाटगांवजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवार, दि. १७/१/२०२५ रोजी पुन्हा एक बिबट्या ठार झाला. वाहनांच्या धडकेने  महिनाभरातील चौथ्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त करत याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.बिबट्या ठार झाल्याची बातमी मिळताच वनविभागाने पथक तातडीने घटनास्थळी अमरावती-नागपूर महामार्गावर दाखल झाले. मृत बिबट्याला वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात नेण्यात आले.याच परिसरात वनविभागाचे अधिकारी आणि वन्य जीव समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे शव विच्छेदन करण्यात आले.अमरावती शहरालगत चिरोडी येथील जंगलात ७ डिसेंबर रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत पण असाच एक बिबट्या मृत्यूमुखी पडला होता. या घटनेच्या अगदी दुसऱ्याच दिवशी अज्ञात वाहनाच्या धडकेने प्राणास मुकला होता. सलग दोन दिवस एकाच मार्गावर दोन दोन बिबटे अपघाती मृत्यू मुखी पडल्याने खळबळ उडाली होती. यानंतर परत दि. २० डिसेंबरला याच एक्स्प्रेस हायवेवर वडाळी ते महादेव गोरी दरम्यान गुणवंत बाबा मंदिराजवळ केवळ दोन वर्षे वयाच्या बिबट्यावर देखील असेच मरण ओढवले होते.अमरावती शहरालगत लागोपाठच्या ह्या बिबट्यावरील संक्रांतीने वन्यप्राणी प्रेमींकडून  गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मागिल काही वर्षांपासून अमरावती शहरालगत बिबट्याचा वावर फारच वाढला आहे. या बिबट्यांच्या सुरक्षेबाबत वनविभागाकडून योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.शहराच्या जवळ रहाटगांव, अर्जुन नगर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात अनेक भागात अनेकदा बिबटे वावरताना दिसून आले आहेत, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल असून  नजिकच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर आहे, येथे देखील सतत बिबट्यांचे दर्शन होत असते.वडाली परिक्षेत्रा अंतर्गत वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्रात या शुक्रवारी मृत्यू मुखी पडलेल्या मादी बिबट्याची प्राथमिक  तपासणी करण्यात आली यावेळी सहाय्यक  वनसंरक्षक (कॅंप व वन्यजीव) अमरावती तसेच मानद वन्यजीव  रक्षक श्री. जयंत वडतकर, पशुधन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. अतुल खेरडे, पशुधन विकास अधिकारी (शल्य चिकित्सालय) डॉ. नितीन  पाटणे उपस्थित होते.