पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर महाडमध्ये तुफान राडा… गोगावलेंच्या समर्थकांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको…  

0
59

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-  

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले आग्रही असताना त्यांच्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आले. यावरुनच शनिवारी रात्रीपासून राडा सुरू झाला आहे. भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आल्याने रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत.मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला आहे. शिवसैनिकांकडून गोगावले यांचा जयजयकार करीत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी जवळपास 2 तास महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली.यावेळी हजारो गोगावले समर्थक रस्त्यावर उतरून तटकरे विरोधात घोषणा देत होते. तसेच घटनास्थळी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या समवेत त्यांच्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून उद्या सकाळी महाड येथे पुन्हा नामदार भरतशेठ गोगावले समर्थक जमा होणार असल्याचे समजते..सध्या जाळपोळ करण्यात आलेल्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन दावे-प्रतिदावे केला जात होते. पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावे यासाठी भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक आग्रही होते. परंतु पालकमंत्रिपदाची माळ आदिती तटकरे यांच्या गळ्यात पडली. सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. आज दिवसभर याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.गोगावले यांनीही पालकमंत्रिपदावरुन डावलण्यात आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “हा निर्णय धक्कादायक असून अजिबात अपेक्षित नव्हता,” असं गोगावले म्हणालेत. “आम्ही शिवसेना भाजपच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून तसं सांगितलं होतं. जिल्ह्यातही तसेच वातावरण तयार झालं होतं. आता जो पालकमंत्रिपदाबाबत निर्णय झाला आहे तो अनपेक्षित आणि मनाला न पटणारा आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही. तरीही आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” असं गोगावले म्हणाले आहेत.