अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्हा परिषदेची हटाळे शाळा ही अलिबाग रेवदंडा मार्गावरील एक महत्त्वपूर्ण शाळा गणली जाऊ लागली आहे… कारण महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन योजनेअंतर्गत या शाळेने तालुकास्तरीय तृतीय क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. या शाळेमध्ये गरीब कामगार व मोलमजुरी करणाऱ्या पालकांचे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण घेत आहेत. विविध उपक्रमात विदयार्थी नेहमीच सहभागी घेऊन शाळेला यश मिळवून देत आहेत. या विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीकरिता नागाव मधील प्रसिद्ध व्यावसायिक श्री सचिन राऊळ यांनी विविध कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक स्पीकर सेट शाळेला भेट दिला आहे. “जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन आज आपले प्रगती झाली आहे, याचा अभिमान मला नेहमीच वाटतो” असे राऊळ यांनी सांगितले. त्यामुळे अशा शैक्षणिक कार्यास माझा नेहमीच मोलाचा हातभार लागावा अशी माझी इच्छा असते. त्यानिमित्ताने हटाळे शाळेस आज मी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध अंगाने विकास व्हावा या दृष्टीने चांगल्या दर्जाचा स्पीकर सेट भेट दिला याचा मला आनंद वाटतो आणि यापुढेही मदत लागली तर मी निश्चित करेन असे यावेळी सांगण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी भोपी, राज्य आदर्श शिक्षक संदीप वारगे , पदवीधर शिक्षिका सीमा नागावकर, उपशिक्षिका विजया माळी उपस्थित होत्या. संदीप वारगे सरांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले.