रसायनी शिवसत्ता टाइम्स (देवा पवार):-
अधिकार संघटनेच्या माध्यमातून जनता आणि पोलीस यांच्यातील दुरावा कमी होण्यास मोठी मदत झाली असून आपत्कालीन परिस्थितीत ही संघटना नेहमीच पोलिसांच्या मदतीला धावून येते, असे गौरवोद्गार खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी काढले. स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार या संघटनेचा पदनियुक्ती कार्यक्रम मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी खोपोली येथे पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. पोलीस निरीक्षक हिरे पुढे म्हणाले की, आम्ही पोलीस नोकरी करत असताना त्याचा पगार घेतो, मात्र स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना निस्वार्थीपणे समाजसेवा करत आहे. समाजातील गैरप्रकार, बेकायदेशीर कृत्ये दूर करण्याच्या उदात्त हेतूने नागरिक स्वयंस्फूर्तीने एकत्र येत आहेत, हे खरोखरच मोलाचे काम आहे. लोकशाहीचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून लोकशाहीचा मुख्य स्तंभ नागरिक असतो. नागरिक जेव्हा पुढे येऊन सक्रिय सहभाग घेतो तेव्हाच लोकशाही यशस्वी होते आणि या प्रक्रियेत स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचा मोठा हातभार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ. दमयंती पांडुरंग कोळी यांनी नव्याने पदनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संघटनेत काम करताना तिची ध्येय उद्दिष्टे, नियम व अटी-शर्तीचे पालन करून प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पदनियुक्तीनंतर देण्यात येणाऱ्या ओळखपत्राचा कोणताही गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असून माहिती अधिकार कायद्याबाबतही त्यांनी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली. हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत पार पडला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे, नवनिर्वाचित नगरसेविका प्रतीक्षा मयूर रेटरेकर, नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गायकवाड, वर्षा मोरे, वसंत देशमुख स्कूलचे व्यवस्थापक उल्हास गजानन देशमुख, अॅड. आकाश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संजय ओवाळ, खोपोली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत संतोष रूपनवर
तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना ही एक सामाजिक संघटना असून मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहणारी व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारी संघटना म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे.

