माणगांव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला बळ देत, कंपनीने भागाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक पात्र बालिकेच्या नावे ५० हजार रुपयांची मुदत ठेव करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. सन २०१७ पासून सुरू असलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत १०० मुली लाभान्वित झाल्या आहेत. या योजनेअंतर्गत ठेवलेली रक्कम मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत सुरक्षित राहते व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणारी ही रक्कम तिच्या उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी उपयोगात येते. आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण अपूर्ण राहू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी भागाड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात २०२४ मध्ये जन्मलेल्या पाच मुलींना मान्यवरांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी माणगावच्या गटविकास अधिकारी सौ. शुभदा पाटील यांनी पोस्को कंपनीच्या सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. “पोस्को कंपनीने केवळ उद्योग उभारला नाही, तर मुलींच्या जन्माचे स्वागत करणारी सकारात्मक संस्कृती समाजात रुजवली आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे,” असे त्यांनी सांगितले.
पोस्को महाराष्ट्र स्टीलचे वरिष्ठ अधिकारी जी. युन पार्क यांनी यावेळी कंपनीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मुलींचे सक्षमीकरण हे केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या विकासाचे अधिष्ठान आहे. भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा कंपनीचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास पोस्कोचे वरिष्ठ अधिकारी, माणगावचे गटविकास अधिकारी, भागाड ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी, पदाधिकारी तसेच लाभार्थी मुलींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम केवळ आर्थिक मदत न राहता ग्रामीण भागातील मुलींना स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी देणारा विश्वासार्ह आधार ठरला आहे.

