उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
करंजा-रेवस, रोरो सेवेसाठी करंजा येथील खासगी जागेतून रस्ता करण्यास करंजा ग्रामस्थांनी आज कडाडून विरोध करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. करंजा-रेवस तसेच मोरा-भाऊचा धक्का अशी रोरो सेवा करण्याचा घाट शासनाने सुरू केला आहे. परंतु त्यापूर्वी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून मच्छिमार बाधवांसाठी करंजा बदरांची उभारणी करून तो सुरू केला आहे. या बदरांसाठी पूर्वनियोजित रस्ता न बनविता जुन्या रस्त्यावरूनच अवजड वाहनांची वाहतूक केली जात आहे. यामुळे करंजा ते उरण चारफाटा रस्त्याची मोठया प्रमाणात दुर्दशा गेली ७ ते ८ महिन्यापासून झाली आहे. तो दुरुस्त करण्यासाठी आजतागायत कोट्यवधी रुपये खर्च करून ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्या आर्थिक साटेलोटामुळे निकृष्ट काम करून शासनाचा निधी वाया गेला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आता लवकरच काम सुरू होईल अशी खोटी आश्वासन देत आली आहेत. प्रत्यक्षात काम सुरू होत नाही याकडे दुर्लक्ष करून रोरो सेवा व करंजा-रेवस पुलासाठी रस्ता बनविण्यासाठी दडपशाही सुरू केली आहे. दिवंगत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशशेठ डाऊर यांच्या कुटूंबियांनी आपल्या मालकी हक्काची जागा गावाच्या हितासाठी व सुप्रसिद्ध द्रोणागिरी मंदिरासाठी येण्याजाण्यासाठी विना मोबदला दिली होती. त्यांची कोणतीही परवानगी न घेता परस्पर त्याठिकाणी रस्ता बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते… सदर खोदकाम मुळे द्रोणागिरी मंदिर आणि शाळेळा भुस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो.
आज संबंधित अधिकारी वर्ग घटनास्थळी येऊन पहाणी करीत असताना ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, सरपंच अजय म्हात्रे यांनी हरकत घेत कडाडून विरोध केला. ज्या ठिकाणी शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात आली आहेत, त्यांच्यावर कारवाई न करता ते वाचविण्याचा प्रयत्न अधिकारी वर्ग करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. खासगी जागेतून सदरचा रस्ता बनवू नये तसेच जुन्या रस्त्यावरून मासळी घेऊन जाणाऱ्या अवजड वाहानांमुळे जीव मुठीत धरून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे, त्यात रो रो सेवा व करंजा-रेवस पूल झाल्यानंतर तर आम्हां ग्रामस्थांची अवस्था “ना घर का ना घाटका” होईल अशी भीती व्यक्त करीत या रस्त्याला विरोध करीत असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी राजू झपाटे कार्यकारी अभियंता मेरिटाइम बोर्ड मुंबई, शिंदे अभियंता करंजा बंदर विभाग. डॉ. उद्धव कदम तहसीलदार उरण जितेंद्र मिसाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण, सरपंच अजय म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर व ग्रामस्थ उपस्थित होते…

