शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष भोईरांचा राजीनामा… संतोष भोईरांच्या अचानक राजीनाम्याने शिवसैनिकांमध्ये खळबळ…

0
50

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):- 

कर्जत विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे… त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे… संतोष भोईर यांनी नाराजीतून हा राजीनामा दिलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे…   शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हासंपर्क प्रमुख  संजय मोरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे…

दरम्यान भोईर हे शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावान आणि कार्यतत्पर नेते म्हणून ओळखले जातात… तसेच आमदार महेंद्र थोरवे यांचे जवळचे महत्त्वाचे नेते म्हणून कर्जतच्या राजकारणात त्यांची ओळख आहे… जेव्हा जेव्हा विरोधकांकडून आमदार थोरवे यांना लक्ष्य करण्यात आलाय तेव्हा संतोष भोईर आपल्या स्टाईलने विरोधकांचा  समाचार घेताना दिसले आहेत… विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या ताकदीने प्रचार केला आणि आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली… मात्र, निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांकडून डावलले जात असल्याने ते नाराज असल्याचे बोललं जात आहे…

लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील भोईर यांचं जिल्हाप्रमुख पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता… मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर त्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली होती… त्यावेळी सुद्धा शिवसेनेतून मोठी धुसफूस बाहेर आली होती…  आता पुन्हा एकदा भोईर यांनी राजीनामा दिला आहे… मात्र हा राजीनामा त्यांनी  स्वतःहून दिला की त्यांच्याकडून तो मागवण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही… त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण गुलदस्त्यात असलं तरी शिवसेनेच्या गटात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे… संतोष भोईर यांच्या या निर्णयाने कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे… त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे…