उरण शिवसत्ता टाइम्स ( प्रविण पाटील) :-
उरण तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई व पुनाडे धरणांची पातळी कमी होत असल्याने उरण नगर परिषदेने रहिवाशांना आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांत पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे…. तर आवरे – कडापे, चिरनेर – केलाचामाळ आदिवासी वाडी वरील विहीरींनी तळ गाठल्याने व या ठिकाणावरील जल जीवन योजनेची कामे रेंगाळल्याने रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे…
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत पुनाडे धरणांतून आठ गावातील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे १० कोटींची योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे… मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदरच्या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे… त्याचा फटका हा या गावातील २५ हजार रहिवाशांना सहन करावा लागत असून, आवरे – कडापे, गोवठणे गावातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे… तरी सदरची योजना पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घ्यावा असे आवाहन अनामिका हितेंद्र म्हात्रे सरपंच वशेणी तथा अध्यक्ष पुनाडे आठ गाव पाणी पुरवठा योजना यांनी केली आहे….
उरण तालुक्यातील पाणी समस्या संदर्भात आमदार महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे तथा उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला आहे… सरकारच्या देखरेखीखाली चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत सुमारे १ कोटी ८० लाख खर्चाच्या जल जीवन योजनेच काम केले जात आहे… परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदरच्या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे… त्याचा फटका आम्हा आदिवासी बांधवांना सहन करावा लागत आहे… तरी सदर प्रशासनाने केलाचामाल आदिवासी वाडीवर टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी गुलाब सुरेश कातकरी यांनी केली आहे…