माजी राज्यमंत्री स्वर्गीय मिनाक्षी पाटील यांचा प्रथम स्मृतिदिनी… नातेवाईक,हजारो कार्यकर्ते यांच्याकडून अभिवादन…

0
38

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जेष्ठ नेत्या मिनाक्षी पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी मार्च 2024 या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा प्रथम स्मृतिदिन तिथीप्रमाणे 18 मार्च रोजी पेझारी येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त त्यांच्या स्मृतीस रायगड सह राज्यभरातील कार्यकर्ते, नातेवाईकांकडून अभिवादन करण्यात आले. प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरू दादा महाराज मोरे यांचे भक्तीरंग कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या सुमधुर सुश्राव्य कीर्तनाचे श्रवण उपस्थितांनी केले. स्वर्गीय मिनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभला होता. शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरवात केली होती. राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केले. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व समृद्ध झाले होते. त्यांच्या विचारांचा वारसा व शिकवण अंगिकरून पुढे वाटचाल करण्याचा संकल्प पाटील कुटुंबियांकडून करण्यात आला. यावेळी माजी आमदार पंडित पाटील, भावनाताई पाटील, ऍड आस्वाद पाटील, माजी सभापती सौ.चित्राताई पाटील, अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक मान्यवर उपस्थित होते.