सिडकोचा कारभार कुंभकर्णासारखा… नैना प्रकल्पाबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या भावना विधानमंडळात…

0
24

पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

नैना प्रकल्पाबाबत विधानपरिषदेमध्ये लक्षवेधी मांडताना आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये पाहायला मिळाले. पनवेल उरण तालुक्यातील नैना प्रभावित क्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या बाबतीतील असलेल्या समस्या,योजनेतील त्रुटी,सिडको अधिकारी यांची उदासीन मानसिकता,ग्रामस्थांशी असलेला संवादाचा अभाव या विषयात मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष आमदार विक्रांत पाटील यांनी वेधून घेतले.यावेळी आक्रमक झालेल्या आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको प्रशासनाच्या कारभाराला कुंभकर्णाच्या झोपेची उपमा देत कुंभकर्णाची झोप तरी सहा महिन्यानंतर पुरी होत होती पण विकास आराखड्याला मंजुरी मिळून १२ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा सिडको प्रशासन ठोस कामगिरी करण्यात अपयशी ठरले असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले…

आंतरराष्ट्रीय विमानतळाला साजेस शहर तयार करता यावं याकरता विमानतळापासून २० किलोमीटर रेडियसमधला विकास नियोजन बद्ध पद्धतीने व्हावा यासाठी नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली…त्यानंतर स्पेशल प्लॅनींग अथॉरिटी म्हणून सिडकोकडे २०१३ रोजी या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली.जबाबदारी देण्यात आल्यानंतर २०१४ पहिला डीपी तयार करण्यात आला व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील विक्रमी वेळेत डी.पी. ला मंजुरी दिली. याला आता १२वर्षाचा चा कालावधी उलटून गेला आहे.मात्र या कालावधीत उदासीन मानसिकता तसेच अर्थकारण असेल याच ठिकाणी रस घ्यायचा या सिडकोच्या धोरणामुळे सिडको ने कोणत्याही प्रकारची ठोस कामगिरी न केल्याने नैना प्रकल्पात समाविष्ठ गावांची संख्या २७० वरून ९४ वर आल्याची माहिती देत सिडकोच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक राहून शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप आमदार विक्रांत पाटील यांनी केला आहे. लक्षवेधी दरम्यान बोलताना आमदार पाटील यांनी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा उल्लेख करुन निर्मानाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले…