रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात बाराजणाची एक कोटी अठ्ठात्तर लाख रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपी रियाज अहमद कासिम बंदरकर (रा.सुरुळपेठ मज्जीद, नांदगाव, ता. मुरुड, जि. रायगड) यास तब्बल सात महिन्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केरळ राज्यातील कोचिन विमानतळावरून ताब्यात घेतले आहे…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सुरुळपेठ येथील मज्जिद येथे काही काळ मौलाना म्हणून काम केलेले रियाज अहमद कासिम बंदरकर याने आर्थिक अडचणीची सबब सांगत दरमहा घरखर्चासाठी पैसे मिळतील असे सांगत दि.२ मे २०२३ ते ०९ जून २०२४ दरम्यान फिर्यादी सलमा अन्वर घलटे (वय-५१ व्यवसाय-गृहिणी,रा.आगरदांडा, ता. मुरुड जि. रायगड) याची रुपये सहा लाख तर इतर अकरा जणांची एक कोटी बहात्तर लाख रुपयांची फसवणूक केली आहे… तसेच फिर्यादी सलमा अन्वर घलटे यांच्याकडून तब्बल सहा लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धनादेशाद्वारे घेऊन त्या रक्कमेचे करार पत्र देऊन फसवणूक केली होती…
फिर्यादी सलमा अन्वर घलटे आणि इतर अकरा जणांनी आरोपीकडे दिलेल्या पैशाची वेळोवेळी मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेला… अखेर फिर्यादी सलमा आणि अकरा जणांनी दिनांक ०३ ऑगस्ट २०२४, रोजी मुरुड पोलिस ठाण्यात रियाझ बंदरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती… मुरुड पोलिस ठाण्यात ११०/ २०२४, भा. द. वि. कलम ४२०,४०६ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंरक्षण अधिनियम (एमपीआयडी) १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता…
दरम्यान आरोपी भारताबाहेर दुबई येथे पळून गेल्याने पोलिसांना त्याला अटक करता आली नाही… त्यानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला…. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने तब्बल सात महिन्यानंतर आरोपीला कोचिन विमानतळावरून पोलिस उप-निरीक्षक नारे यांच्या पथकाने दि. २५ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेत अलिबाग येथे आणले… आरोपीस अलिबाग येथील न्यायाधीश निळकंठ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास २ एप्रिल २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे…