माणगाव शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
दिवसेंदिवस महागाईचा आलेख उंचावत आहे… बाकी कसलीच प्रगती झाली नाही तरी चालेल पण हा ग्राफ कमी होता कामा नये, असेच धोरण सध्या राबविण्यात येत आहे…GDP Growth Rate (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) विकासाचा दर वगैरे शब्द आता सवयीचे झाले आहेत, सर्वसामान्यांना त्यांचे काही सोयर-सुतक उरलेले नाही… घरगुती गॅस सिलिंडरच्या दिवसेंदिवस वाढत्या किमती पाहता आता गॅसवर स्वयंपाक करणे परवडणारे नाही… पुनः एकदा लाकुडफाट गोळा करुन, शेणी-गोवऱ्या थापायची वेळ येऊन ठेपली आहे असे खेड्यापाड्यातून बोलले जात आहे… कारण उज्वला गॅस आल्याने आदिवासी वस्ती-वाड्यातून देखील चुलीतून धूर निघायचा बंद झाला होता…
लोकांना गॅस घेण्यासाठी सरकारने चांगली योजना आणली आणि त्याची सवय लोकांना लावली होती… आता सबसिडी शिवाय मिळणाऱ्या विकतच्या गॅसने जनतेचा चांगलाच किस निघतोय… कारण गॅस सिलिंडर आता आठशे तिस रुपये इतका महागला आहे… आपले प्रपंच चालवितांना जनतेचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे… मात्र सर्वसामान्य दारिद्र्यरेषेखालील जगणारांचे काय याबाबत एक चकार शब्दही कोणी काढत नाही, विरोधीपक्ष आवाज उठविनासा झाला आहे, सगळे राजकारण घडते आहे… शेवटी “जुनं तेच सोनं” म्हणत सामान्यांवर परत चुली फुंकायची वेळ आली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.