कचरा गाडी नियमित येण्यामुळे वॉर्ड क्र. 16 मधील नागरिक समाधानी…

0
52

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

गेल्या अनेक महिन्यानंतर माणगाव नगर पंचायतनी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी नियमितपणे सुरू केली आहे…खास करून खांदाड येथील वॉर्ड क्र. 16 मधील नागरिक, विशेषतः महिला वर्ग, यावर समाधान व्यक्त करत आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, माणगाव नगर पंचायत अंतर्गत शहरातील रस्ते, आस्थापनं आणि घराघरातील कचरा सफाई कंत्राटी कामगारांद्वारे उचलला जातो. ही स्वच्छता मोहीम नियमितपणे कचरा गाडीच्या माध्यमातून केली जात होती. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून घराघरातील कचरा उचलण्याची सेवा अनियमित झाली होती…कधी गाडी तीन दिवसांनी, कधी दोन दिवसांनी, तर कधी एक दिवस आड येत होती. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती.

स्वच्छता विभागाच्या कामकाजात दुर्लक्ष आणि कचरा उचलण्यास असलेली गाडीची कमीपण यामुळे ही समस्या गंभीर बनली होती. अनेकदा गाडी ब्रेकडाउन होणे, कामगारांची अनुपलब्धता आणि अन्य कारणांमुळे कचरा उचलणीला विलंब होत होता. नागरिकांनी व्हाट्सअ‍ॅपवर स्वच्छता विभागाला अनेक वेळा कचरा गाडीच्या नियमिततेबाबत माहिती दिली आणि त्यांच्या तक्रारींचं समाधान करण्याची मागणी केली.

त्यानंतर, स्वच्छता विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली आणि कचरा उचलण्याची नियमित सेवा सुरू केली. गेल्या दहा दिवसांपासून घंटागाडी नियमितपणे वॉर्ड क्र. 16 मध्ये कचरा उचलण्यासाठी येत आहे. उदाहरणार्थ, 28 मार्च 2025 रोजी संध्याकाळी, 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10:05 वाजता, 30 मार्च 2025 रोजी दुपारी 02:20 वाजता, 31 मार्च 2025 रोजी दुपारी 01:40 वाजता, 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी आणि 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी 02:40 वाजता कचरा गाडीने कचरा उचलला. तसेच 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 08:15 वाजता आणि 4 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:15 वाजता कचरा संकलन करण्यात आले.

या नियमित सेवा सुरू झाल्यानंतर महिलांनी आपली समाधान व्यक्त केली आहे. एक गृहिणी म्हणाल्या, “कचरा गाडी आता रोज नियमितपणे येत आहे आणि हे आम्हाला खूप चांगले आणि समाधानकारक आहे.”नगर पंचायतने कचरा उचलण्याची नियमित सेवा सुरू केल्याने वॉर्ड क्र. 16 मधील नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.