अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
रायगड जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत अवैध धंदे बंद केले आहे…असा दावा केला असला तरी जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध धंदे बिनबोभाट सुरू असल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये नव्याचे नऊ दिवस आणि परत येरे माझ्या मागल्या प्रमाणे धंदे सुरू असून काही ठिकाणी धंद्यामध्ये वाढ देखील झाली आहे…मग हे धंदे बंद असल्याचा दावा का केला जात आहे ? हा सवाल उपस्थित होत आहे…
गेल्या काही महिन्यापूर्वी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या सूचनेनुसार त्यांच्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी अलिबाग तालुकासहित जिल्ह्यातील काही ठिकाणी छापे टाकून सुरू असणारे चक्री, मटका यासारखे जुगार बंद करीत रायगड जिल्हा अवैध-धंदा मुक्त करणार असल्याचा केविलवाणा दावा केला होता…
रायगड जिल्ह्यात मटका, चक्री जुगार पत्ता क्लबच्या नावाखालील अवैध धंद्यांशिवाय वेश्या व्यवसाय, डिझेल विक्री सारखे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत… कमी श्रमात आणि झटपट पैसे मिळविण्याच्या आशेने गरीब, हमाल, रिक्षाचालक, शेतकरी याकडे आकर्षित झाले आहेत… विशेष म्हणजे धनदांडगे व्यापारी, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी देखील या अवैध धंद्यात गुंतले आहेत… पोलिसांच्या देखत मटका अड्डे सुरू आहेत… शहरात व जिल्ह्याभरात सुमारे २००० पेक्षा अधिक मटका अड्डे असल्यामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली असतानाही या धंद्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे….
मटका, जुगार आणि क्लब चालकांना पोलिस यंत्रणेचे आशीर्वाद असल्याशिवाय हे सुरू ठेवणे शक्य नाही…. ही बाब अनेकदा स्पष्ट झाली आहे… पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केल्यास अवैध धंदे हद्दपार होण्यास काहीच वेळ लागणार नाही, मात्र पोलीस थातूरमातूर कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत… रायगड जिल्ह्यातील पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी हे छोट्या छोट्या धंद्यावर कारवाई करीत या कारवाईनंतर मोठी कारवाई करण्यात येईल असे बडेजाव करीत असतात मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अपेक्षा फोल ठरली आहे…
पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षाने …हप्त्याच्या स्वरूपात प्रति महिना लाखो रुपये मलिदा मिळत असल्याने या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवत नाहीत…रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, माणगाव, म्हसळा, महाड, कर्जत, खालापूर, श्रीवर्धन, रोहा, सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू असून, काही प्रमाणात राजकीय तसेच संबधित विभागाचा वरदहस्त असल्याची चर्चा नाक्यानाक्यावर सुरू आहे….
पूर्वी मटक्याच्या चिठ्ठया सापडत होत्या… एका चिटोऱ्यावर मटक्याचे आकडे लिहून पैशाचे व्यवहार चालत होते…आता मोबाईलच्या जमान्यात मटका व्यवसायही आधुनिक झाला…..मटका बुकींनी मोबाईलवरून ऑनलाईन मटका घेण्यास सुरुवात केली…गल्लीच्या कोपऱ्यावर,चौकात, बोळात दिसणारी मटक्याची खोकी आता कालबाह्य झालीत…पण, मटका कालबाह्य झाला नाही… त्यामुळेच मटका व्यवसाय जोरात असला तरी तो उघडपणे दिसत नाही…म्हणून पोलिसांना माहिती नाही,असे होत नाही… ऑनलाईन मटक्यामुळे बुकी अदृश्य झाले तरी त्यांनी पंटरमार्फत आपला मटक्याचा धंदा सुरू ठेवला आहे… जिल्ह्यात मटका व्यवसाय जोमात सुरू असण्यासाठी कुणाचा वरदहस्त आहे? हा चर्चेचा विषय आहे…अवैध धंद्याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय तो चालत नाही, असा पूर्वापार इतिहास आहे… त्यामुळेच शहरात आणि जिल्ह्यातही मटका व्यवसाय कुणाच्या वरदहस्ताने चालतो? जिल्ह्यात सर्वत्र मटका अड्डे सुरू असून प्रत्येकाने आपापले विभाग वाटून घेतले आहेत… विशेष म्हणजे हे मटका माफिया एक-दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करत नसल्याने जिल्ह्यात शांतता असल्याचे भासविले जाते तसेच जुगार आणि चक्री, पत्ता क्लबच्या नावाखालील या अवैध धंद्यासहीत वेश्या व्यवसाय, डिझेल विक्री सारखे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत….
मटका जुगारामुळे सर्वसामान्य जनतेचा संसार देशोधडीला लागला आहे…. मटका जुगार सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे…तरी यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे…