रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. रोहा तालुक्याचे ठाकरे गटाचे प्रमुख समीर शेडगे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला असून ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश येत्या 13 एप्रिल रोजी होणार असून, यावेळी राज्याचे महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
समीर शेडगे हे रोहा तालुक्यातील ठाकरे गटाचे सक्रिय आणि प्रभावशाली नेते मानले जात होते. मागील काही काळापासून ते पक्षाच्या धोरणांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. स्थानिक राजकारणातील बदलते समीकरण, आणि ठाकरे गटातील गोंधळ व अनिश्चितता यामुळे त्यांनी अखेर वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शेडगे यांचा पक्षप्रवेश हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
या प्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेडगे यांच्यासोबत इतर काही स्थानिक कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, अशीही माहिती मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात असून, दोन्ही गटांमध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
13 एप्रिल रोजी होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, या सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.