अजंठाच्या फेरी बोटीत शिरले पाणी… सेवा सुरू होण्याच्या दिवशीच घटना…दैव बलवत्तर म्हणून सुमारे 150 प्रवासी बचावले

0
40

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

शुक्रवारी मुंबई ते मांडवा नवीन अजंठा कॅटमरन बोट सर्व्हिस चालू झाली. प्रवाशांनी ही सेवा सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला. परंतु प्रवाशांचा या आनंदावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विरजण पडले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया वरून सुमारे दीडशे प्रवाशांना घेऊन निघालेल्या फेरी बोटीत अचानक पाणी शिरले. गेटवे पासून काही अंतरावर ही बोट गेली आणि पाणी शिरल्याने प्रसंगावधान राखून बोटीच्या तांडेलाने तातडीने किनाऱ्यावर संपर्क करून बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचवले.

किनाऱ्यावरून तातडीने स्पीड बोटी मागविण्यात आल्या आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी सांगून अजंठा बोटीत पाणी शिरल्याच्या घटनेला दुजोरा दिला…मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया हा जलप्रवास वेळेची बचत आणि सुरक्षित असल्याने प्रवासी आणि पर्यटक येथून येणे पसंत करतात. परंतु गेल्या काही वर्षात या जलमार्गावर बोटींना अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. खास करून अजंठा प्रवासी जलवाहतूक सेवा देणाऱ्या बोटींचे अनेकदा अपघात  झाल्याचे सर्वश्रुत आहे. शुक्रवारी नवीन अजंठा जलवाहतूक करणाऱ्या बोटींची सेवा सुरू करण्यात आली. यासाठी मालकांनी नवीन बोटींची व्यवस्था केली. परंतु सकाळी सुरू झालेली ही सेवा सायंकाळी पर्यंत बोटीत अचानक पाणी शिरल्याने कोलमडली.

सायंकाळी अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. बोट गेटवेच्या धक्क्याला लागली आणि सुमारे 150 प्रवाशांनी बोटीत एकच गर्दी केली. बोट मांडव्याच्या दिशेने रवाना झाली. अजंठाची प्रवासी खचाखच भरलेली हो बोट गेटवे पासून समुद्रात 1 ते दीड नॉटिकल मैलावर पोहचली आणि बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. ही गंभीर बाब बोटीच्या तांडेलच्या लक्षात आली. त्याने तातडीने प्रवाश्यांना सावधान केले. आपत्ती निवारण करणाऱ्या यंत्रणेला संपर्क केला. किनाऱ्यावरून तातडीने स्पीडबोटी बोलावून बोट मध्ये असणाऱ्या सुमारे दीडशे प्रवाशांना सुखरूप बोटीतून बाहेर काढून किनाऱ्यावर आणले. तातडीने दुसऱ्या बोटींची व्यवस्था करीत प्रवाशांना मांडवा येथे आणण्यात आले. ज्या बोटीमध्ये पाणी शिरले, रया बोटीला मांडवा येथे आणण्यात आले. त्या बोटींचे काम करून पुन्हा ती बोट प्रवासी वाहतूक करण्यासाठी सोडण्यात येणार असल्याचे समजते.