नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):-
पनवेल तालुक्यातील जमिनीवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने धरणे आंदोलनाचा इशारा दिला असता, सदर आंदोलन स्थगित करावे यासाठी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सिडको अधिकाऱ्यांशी समन्वय साधत पत्रकारांच्या या धरणे आंदोलनास सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. त्यानुसार दि. २५ सप्टेंबर रोजी सिडकोच्या दक्षता विभागाचे अधिकारी श्री. गायकवाड यांच्यासोबत बैठक लावण्यात आली. या बैठकीमध्ये सिडकोचे दक्षता विभागाचे मुख्य अधिकारी सुरेश मेंगडे यांच्याशी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून देण्यात आला. यावेळी सुरेश मेंगडे यांनी उपस्थित शिष्टमंडळाला धरणे आंदोलन स्थगित करावे यासाठी दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता विमानतळ प्राधिकरणचे सहव्यवस्थापक शंतनू गोयल यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत योग्य आश्वासन मिळाले नाही तर त्याचं क्षणी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असेही पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सांगितले…
सिडकोने विकसित केलेल्या आणि पनवेल तालुक्यातील जमिनीवर विकसित झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लवकरच विमानोड्डाण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे…विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी मागील तीन वर्षांत प्रकल्पग्रस्तांनी अनेक आंदोलने केली आहेत.विविध संघटना, राजकीय पक्ष विमानतळ नामांतरासाठी आंदोलन करीत असतात.मात्र हे सर्व नागरिकांच्या समोर आणण्याचे काम पत्रकार करीत आहेत. मात्र पत्रकारांच्या देखील मागण्या त्यांना सविस्तरपणे मांडता याव्यात यासाठी पनवेल तालुक्यातील पत्रकार एकत्र येत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या बॅनरखाली विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याची तयारी दर्शविली.
त्यानुसार या आंदोलनापूर्वीच बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे अधिकारी चेतन अहिरे यांनी सिडको अधिकाऱ्यांशी समन्वय साधत सदरचे धरणे आंदोलन होण्यापूर्वीच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी देखील सहकार्याची भूमिका घेत आंदोलनापूर्वी सिडको भवन बेलापूर येथे विमानतळ प्राधिकरण सह व्यवस्थापक शंतनू गोयल यांच्यासोबत त्यांच्याच दालनात दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता बैठक लावण्याची भूमिका घेतली.
पनवेल तालुक्यातील जमिनीवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून सिडकोमार्फत तसेच राज्य सरकारच्या वतीने प्रस्ताव गेला आहे. असे असताना देखील केंद्र सरकारकडून अद्याप या नावाबाबत निर्णय घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले नाही. या नामांतराच्या प्रश्नावरून नक्की विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लागेल की नाही, याबाबत जनतेत असंतोष आहे आणि हाच असंतोष दूर करण्यासाठी तसेच जनतेला योग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे.
यावेळी सिडको व्यवस्थापकीय मंडळाने दि. २६ सप्टेंबर रोजी लावलेल्या बैठकीदरम्यान सिडकोची भूमिका आणि आवाहन काय होतंय यानुसार पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील यावेळी शिष्टमंडळाने स्पष्ट केलं आहे. सिडकोचे अधिकारी गायकवाड यांच्यासोबत झालेल्या बैठकीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे जेष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, क्षितिज कडू, सुनील पाटील, चंद्रकांत शिर्के, असीम शेख, बेलापूर पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस अधिकारी चेतन अहिरे आदिंसह शिष्टमंडळ उपस्थित होते.