माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
माणगाव तालुक्यातील साळवे (सर्वे नं. 113) येथील संरक्षित वन क्षेत्रात २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजता अचानक लागलेल्या भीषण वणव्यामुळे परिसरात धुरांचे लोट उठले आणि वनसंपदेवर गंभीर धोका निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच प्रशांत पा. शिंदे वनक्षेत्रापाल माणगाव यांचे मार्गदर्शन खाली वनरक्षक वैशाली भोर यांनी तात्काळ पथक सज्ज करून पवन चौधरी, दुर्गेश पाटील, राणी लिंबोरे आणि स्वप्निल मस्करे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री झाडाझुडपांतून वाट काढत त्यांनी जीव धोक्यात घालून अथक प्रयत्नांतून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. वणवा वाऱ्यामुळे झपाट्याने पसरत होता, त्यामुळे अनेक वन्य प्राणी, औषधी वनस्पती आणि जैवविविधतेवर संकट निर्माण झाले होते. साधनांची कमतरता असूनही पथकाने आपल्या अनुभव, प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर ही आग नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळवला. या धाडसी कार्याबद्दल गावकऱ्यांनी वनरक्षकांचे भरभरून कौतुक केले असून जिल्हाभरातून वनविभागाच्या तत्परतेचे अभिनंदन केले जात आहे. यानंतर वनविभागाने जंगलात अनधिकृत प्रवेश व उघड्या आगी लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला असून स्थानिक पातळीवर जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवण्याची तयारी सुरू आहे. या घटनेतून वनसंवर्धन आणि जैवविविधतेचे महत्व अधोरेखित झाले असून वनरक्षक व मजुरांचे कार्य खरंच सलाम करण्याजोगे आहे.