खोपोली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
खालापूर तालुक्यातील कलोते रयती येथील रहिवासी तुषार तुळशीदास येरूणकर हे माजी सैनिक असून 17 वर्ष त्यांनी भारतीय सेनेत सेवा दिली आहे. अन्यायाविरूध्द पेटून उठायचे… देशाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे… देश व समाजाच्या शत्रूंविरोधात जिवाची पर्वा न करता लढा द्यायचा, असे बाळकडू त्यांना सैनिक जिवनात मिळाले आहे आणि त्याच तत्व व मूल्याच्या अनुषंगाने सन 2024 पासून अवैध भराव,उत्खनन व झाडे तोडल्याबद्दल ते लढा देत आहेत, पण खालापूर तहसिल (महसूल), वन विभाग व पोलिस प्रशासनाकडून ‘तारीख पे तारीख’ देत वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे…दरम्यान, तहसिलदार अभय चव्हाण यांच्या केबीनबाहेर माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असा भला मोठा फलक लावला आहे. पण जानेवारी 2024 पासून माजी सैनिकाचा लढा सुरू आहे आणि अजून न्याय मिळालेला नाही, तरी फलकावर लिहलेल्या ओळी प्रत्यक्षात उतरतील का ? खालापूर तहसिलदार अभय चव्हाण माजी सैनिकाला न्याय देतील का ? असा प्रश्न स्वत: माजी सैनिक येरूणकर यांनी उपस्थित केला आहे.
माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी 19 मार्च 2024 रोजी चौक मंडळ अधिकारी यांना कलोते रयती सर्वे नं. 10 मध्ये अवैध मातीचा भराव सुरू असल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च 2024 रोजी मंडळ अधिकारी व तलाठी सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी तक्रारदार माजी सैनिक येरूणकर यांना बोलावून घेतले. येरूणकर सदर जागी पोहचल्यावर अरूण आबा येरूणकर, यशवंत आबा येरूणकर,अश्विनी अरूण येरूणकर यांनी माजी सैनिकाला शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. माजी सैनिकाला मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमोर जिवंत गाडण्याची व संध्याकाळी बघून घेण्याची धमकी देण्यात आली…
दरम्यान, याप्रकरणी माजी सैनिक येरूणकर यांनी खालापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी परस्पर बोलावून प्रकरण निकाली काढले होते. माजी सैनिकाला आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली नव्हती. अखेर 13 ऑगस्ट 2024 रोजी माजी सैनिक येरूणकर यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक यांना लेखी निवेदन देवून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. 20 एप्रिल 2024 रोजी माजी सैनिकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तसेच अवैध भराव व झाडे तोडणाऱ्या धनदांडग्यावर खालापूर पोलिस स्टेशनला भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण जवळजवळ एक वर्ष उलटला तरी कारवाई करण्यात आलेली नाही. आजही माजी सैनिक येरूणकर व त्यांचे कुटुंब दहशतीखाली वावरत आहेत तर दुसरीकडे धमकी देणारा मदमस्त आयुष्य जगत आहे… सर्रासपणे अवैध कामे करीत आहे.