जळगाव शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
भारत भूमीच्या संरक्षणार्थ देशाचे रक्षण करणारे जळगाव जिल्हा पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या ग्रामीण भागातील रहिवाशी असलेले सीआरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान यादव नेतकर यांचे बालाघाट या ठिकाणी कर्तव्य बजावत असतांना ८ मे रोजी पहाटे ३:३० दरम्यान वीरमरण आले. मृत्यू समयी ते५५ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,सून,एक मुलगी, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत प्रेमळ मनमिळावू स्वभावाचे असलेले भगवान नेतकर यांच्या आकस्मित निधनामुळे संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र शोककळा पसरली.बालाघाट येथून त्यांचे पार्थिवदेह त्यांच्या जन्म गावी उंदीरखेडे येथे आणल्यावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्ययात्रेत सीआरपीएफ डेप्युटी कमांडर श्री.मनोज कुमार व त्यांचा संपूर्ण स्टाफ तसेच पारोळा पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस स्टाफ तसेच माजी परिवहन मंत्री डॉ.सतीश पवार,जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ,पारोळ्याचे तहसीलदार डॉ.उल्हास देवरे,पारोळ्याचे गटविकास अधिकारी संजय मोरे,जळगाव जिल्ह्याचे मा.सैनिक अधिकारी रतिलाल महाजन,विश्वनाथ उगले,यांच्यासह विविध शासकीय,राजकीय,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, क्रीडा व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते… यावेळी सीआरपीएफचे जवान व पोलीस बांधवांनी सशस्त्र मानवंदना दिली. यावेळी कुटुंबीयांसह अनेकांना अश्रू अनावर झाले.भगवान यादव नेतकर यांचा जलदान विधी व शोकसभेचा कार्यक्रम सोमवार दि.१२ मे रोजी पारोळा येथील त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.