ड्रायव्हर उत्तर प्रदेशचा, मुद्देमाल माणगावात – वनविभागाची कारवाई चकित करणारी…

0
10

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

दिनांक 11 मे 2025 रोजी माणगाव वनपरिक्षेत्रात वनविभागाने गुप्त माहितीवरून चकित करणारी आणि परिणामकारक कारवाई केली. मा. उपवनसंरक्षक रोहा डॉ. शैलेंद्रकुमार जाधव व मा. सहा. वनसंरक्षक रोहित चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे आणि त्यांच्या पथकाने वैशाली भोर, अनिल मोरे, किरण जाधव आणि पवन चौधरी यांच्यासह ही कारवाई केली.

दुपारी 1.45 वाजता मिळालेल्या गुप्त बातमीवरून माणगाव येथील मन मंदिर स्वीटजवळ टाटा ट्रक (क्र. DN 09 R 9047) ची तपासणी करण्यात आली. तपासणीत ट्रकमध्ये 20.056 घनमीटर खैर लाकूड (सोलीव माल) आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत ₹1,05,308 रुपये आहे. सदर लाकूड कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित ट्रकची अंदाजे किंमत ₹8,00,000 रुपये असून, एकूण ₹9,05,308 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 41(2)(ब) आणि 42 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी 1) रियाज हुसेन (वय 41 वर्ष, रा. उत्तर प्रदेश) व 2) रहिम फईम खान (वय 22 वर्ष, रा. उत्तर प्रदेश) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मा. उपवनसंरक्षक डॉ. जाधव व सहा. वनसंरक्षक श्री. चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शिंदे (वनपरिक्षेत्र अधिकारी, माणगाव) व ज्ञानदेव सुभेदार (वनपाल, माणगाव) करीत आहेत. संपूर्ण कारवाईत दक्षता, तत्परता व कायद्यानुसार केलेल्या प्रभावी कारवायबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे व त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच संपूर्ण वनविभागाचे मन:पूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.