म्हसळा शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावात तुटपुंज्या पावसाने बांद्रे आजींचं घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, वयोवृद्ध आजींवर दुहेरी संकट ओढवलं आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना – युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने युवासेना तालुका अधिकारी श्री. कौस्तुभ विलास करडे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी तातडीने भेट देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घराची पाहणी करून आजींना आवश्यक तेवढा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी शिवसेना तालुका प्रमुख श्री. सुरेश कुडेकर, तसेच युवासेना शहर अधिकारी श्री. अंकुश नटे हेही उपस्थित होते. त्यांनी बांद्रे आजींशी संवाद साधून शासनाकडून लवकरात लवकर घरकुल मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. प्राथमिक मदत म्हणून अन्नधान्य किट युवासेनेच्या वतीने तत्काळ देण्यात येणार असून, आजींना सांगण्यात आलं की शासनाने या घटनेची दखल घेतली आहे. लवकरात लवकर आपलं नवीन घर उभं राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या घराच्या पंचनाम्याची माहिती घेण्यात आली असून, संबंधित यंत्रणांना त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कौस्तुभ करडे यांच्या नेतृत्वात युवासेनेने दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता ही सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरते. अशा संकट काळात राजकीय पक्षांनी केलेली मदत गरजूंसाठी मोठा आधार ठरते, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.