उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील अंतर्गत गावांना समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. खारफुटीच्या जंगलासह मुबलक प्रमाणात जैवविविधता लाभली आहे. मात्र,गावाबरोबर रस्त्यालगत असलेल्या खाडीकिनाऱ्यावर गोदाम मालक तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणात डेब्रिज, मुरुम, मातीचा भराव टाकून खाडी बुजवून पाणथळ क्षेत्र, खारफुटीची वने नष्ट करत आहेत.त्यामुळे खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी व जैवविविधता धोक्यात येऊन गाव परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शासनाने खारफुटी (कांदळवन) वनविभागाकडे हस्तांतरित केले आहे. मात्र, उरण तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी वर्गाने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता स्वतःचे आर्थिक हित साधण्यासाठी जास्त लक्ष देणे पसंत केल्याने सद्यःस्थितीत तालुक्यातील भेंडखळ,चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणे, पागोटे,नवघर,खोपटा, धुतूम, सोनारी, करळ, जासई, बोकडवीरा, नवीन शेवा, चाणजे, सोनारी, जसखार, नवघर, पाणजे सह इतर गावालगतच्या खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीची कत्तल करून त्याठिकाणी डेब्रिज माती, मुरुमचा भराव केला जात आहे.
भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील बामर लाॅरी सी.एफ.एस.आणि कोन्कस सी.एफ एस जवळ द्रोणागिरी नोडमधील कचरा संकलन करुन डंपिंग केला जात आहे.त्यामुळे भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक आजाराने त्रस्त आहेत…यांचे सोयरसुतक भेंडखळ ग्रामपंचायत प्रशासनसह निवडणून आलेला सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नाही याबाबत कुठलीही कारवाई करण्यात येत नाही…
तसेच फ्लोमिगोसह इतर पक्षांची पाणथळ क्षेत्रही नष्ट केली जात आहेत.यासंदर्भात दक्ष नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी वन विभाग व इतर शासकीय कार्यालयत तक्रार दाखल केली आहे.मात्र सदर तक्रारींकडे शासन यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी व जैवविविधता धोक्यात आली असून येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.तालुक्यातील खारफुटीची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला,तसेच काहीना वन विभागाकडून नोटीस पाठवली, पण प्रत्यक्षात कोणावरच कारवाई झालेली नाही.एकंदरीत पर्यावरण रक्षणासाठीच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही…