खा. सुनील तटकरे यांच्यावरच्या खोट्या आरोपांचा निषेध; माणगावात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली शक्तिप्रदर्शन…

0
35

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून करण्यात आलेल्या खोट्या, निराधार व राजकीय हेतूने प्रेरित आरोपांचा तीव्र निषेध करण्यासाठी शुक्रवार, ०६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता माणगाव येथील कुणबी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ही पत्रकार परिषद शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते प्रमोद घोसाळकर व अरुण चाळके यांनी गुरुवार, ०५ जून २०२५ रोजी खा. तटकरे यांना “मोठा गद्दार” म्हणत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.

पत्रकार परिषदेला सुरुवात करताना ज्येष्ठ नेते सुभाष केकाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करत खा. तटकरे यांच्यावरच्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला. “ही टीका पूर्णतः खोटी व राजकीय हेतूने प्रेरित आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते पालकमंत्री पदाच्या वादावरून स्वतःतील मतभेद लपवण्यासाठी हे आरोप करत आहेत. खरा गद्दार कोणी आहे हे जनतेला ठाऊक आहे,” असा पलटवार त्यांनी केला. प्रमोद घोसाळकर व अरुण चाळके यांनी खा. तटकरे यांच्याविरोधात वापरलेली भाषा निषेधार्ह असल्याचं सांगत, “हेच लोक सतत पक्ष बदलण्याचे विक्रम ठेवतात,” अशी सडकून टीका त्यांनी केली. त्यांनी यावेळी खा. तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत मुंबई-गोवा महामार्गाचे काम गतीने सुरू ठेवण्यासाठी घेतलेल्या भेटी, प्रयत्नांचीही माहिती दिली. “त्या दौऱ्यांमध्ये घोसाळकर व चाळके हे स्वतः सहभागी होते, त्यामुळे आज त्यांनी तटकरे यांच्यावर आरोप करणे म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे,” असेही ते म्हणाले. “अशा टीकांना आम्ही निवडणुकीतच कडवे उत्तर देऊ,” असा इशारा देत पत्रकार परिषद संपवण्यात आली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुकाध्यक्ष बाळाराम (काका) नवगणे, माजी विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर, युवक अध्यक्ष शादाब गैबी, महादेव बक्कम, राम टेंबे, गजानन अधिकारी, शांताराम भोरावकर, प्रकाश लाड, दीपक जाधव, तुकाराम सुतार, आनंद यादव, सौ. संगीता बक्कम, रवींद्र मोरे, किशोरी हिरवे, सौ. योगिता चव्हाण, राजेंद्र शिर्के, शैलेश भोणकर, नितीन वादवळ, दिलीप जाधव, रत्नाकर उमरे, विलास यादव, राजू मोरे, शौकत रोहेकर, इकबाल हर्णेकर, महेश महाजन, किरण पागार, शुक्रादास मोरे, रामभाऊ टेंबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाकडून या विषयावर अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट करण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.