रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेकासाठी रायगड किल्ल्यावरील नाणे दरवाजा येथे बंदोबस्तासाठी असणारे गृह दलाचे (होमगार्ड) दोन रक्षक जखमी झाले असून या सोहळ्यासाठी किल्ल्यावर बेधुंद नाचत असलेला शिवभक्त याला भोवळ आली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तारखेनुसार “राज्यभिषेक दिन” असल्याने रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित राहिले होते… उपस्थित राहणाऱ्या शिवभक्ततांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनासह लगत असणाऱ्या पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस प्रशासनासह गृह रक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते…
किल्ले रायगडावरील नाणे दरवाजा येथील पायरी मार्गावर दगडी कोसळल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तैनात करण्यात आलेले गृह दलाचे (होमगार्ड) दोन रक्षक जखमी झाल्याची घटना दि. ( ५ जून २०२५) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. या दोन्ही जखमी होमगार्डवर पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे… रोहित कदम आणि प्रणय मोरे अशी या गृह रक्षक दलाच्या जवान यांची नावे असल्याची माहिती महाड तहसीलदार शितोळे यांनी दिली आहे…
तसेच ६ जून रोजी सकाळी राज्यभिषेक सोहळा सुरू असताना एक शिवभक्त बेधुंद होऊन नाचत असताना त्याला भोवळ आल्याने त्यास पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महाड तहसीलदार शितोळे यांनी दिली आहे.