अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
सत्यवानाचे प्राण मृत्यूची देवता यमराजाकडून परत आणणाऱ्या सावित्रीचा आजचा दिवस. वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यावनांनी सावित्रीचे कुंकू अबाधित ठेवण्यासाठी चक्क वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या… अलिबाग बायपास येथे पेण अलिबाग रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्यासाठी साकडे यावेळी सत्यावनांनी घातले… गेले अनेक वर्षांपासून अलिबाग बायपास येथील खड्ड्यांची असणारी समस्या कायमची संपवून संभाव्य अपघाताला आळा घालण्यासाठीची मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली… निमित्त रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे होते परंतु योग मात्र वटपौर्णिमेचा होता.
अलिबाग शहराच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अलिबाग वडखळ रस्त्यावर अनेक वर्षे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे. लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजविण्याची मागणीदेखील केली आहे. परंतु या मागणीला आणि प्रयत्नाला शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या रस्त्यावर सुमारे 3 फुटांचे खड्डे पडले आहेत. पाऊस असल्यावर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून येथे तळे तयार होते. याचा नाहकचा फटका वाहनचालकांना बसत आहे. या ठिकाणी कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे.
लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक तरुणांनीच गांधींगिरीचा पर्याय निवडला.या तरुणांनी वट पौर्णिमेच्या दिवशी शासनाचे लक्ष वेधले आहे. तरुणांनी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात वडाचे झाड लावून विधिवत पूजा करून वडाला फेऱ्या मारल्या. या दरम्यान त्या तरुणांनी वाहनचालकांचे प्राण वाचवण्याचे साकडे घालून अधिकारी वर्गाला सद्बुद्धी देण्याची विनवणी केली. तरुणांनी केलेला हा प्रकार पाहून वाहनचालकांनी आणि नागरिकांनी त्यांना साथ दिली.
सवित्रीनेच सत्यवानाचे प्राण मृत्यूच्या देवतेकडून परत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याची पौराणिक कथा आहे. मंगळवारी वट पौर्णिमेच्या दिवशी सत्यवानांनी सावित्रीचे कुंकू अबाधित राहूदे असे साकडे घातल्याचे अलिबाग वडखळ रस्त्यात पहावयास मिळाले.