माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
वाढदिवस म्हटलं की बहुतांश वेळा केक, पार्टी, भेटवस्तू आणि सेलिब्रेशन. पण काही सेलिब्रेशन हृदयाला भिडणारे असतात, समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. असाच एक आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम घडून आला आहे माणगावमध्ये – जिथे दोन मुलांनी आपल्या वडिलांचा ५० वा वाढदिवस साजरा करताना रुग्णसेवेचा हातभार लावला. जय आणि राज संतोष खाडे या दोन तरुणांनी आपल्या वडिलांना वाढदिवसाची जी भेट दिली ती होती – ७०० सलाईन बॉटल्स उपजिल्हा रुग्णालय माणगावला देणगी म्हणून देणे. या छोट्याशा कृतीतून त्यांनी दाखवून दिलं की वाढदिवस केवळ साजरा करण्याचा नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याचाही दिवस ठरू शकतो. संतोष खाडे हे निजामपूरचे मूळ रहिवासी असून माणगाव तालुक्यात रुग्णसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दैनंदिन सेवा कार्याचा त्यांच्या मुलांवर खोल परिणाम झाला होता. त्यामुळेच सरकारी रुग्णालयातील गरजा ओळखून त्यांनी आपल्या साठवलेल्या पैशातून ही मदत केली. यावेळी उपस्थित असलेले संतोष खाडे अत्यंत भावुक होत म्हणाले,“ही भेट केवळ मला नव्हे, तर माझ्या कार्याला मिळालेला सन्मान आहे. या पुढील जीवन समाजसेवेसाठी समर्पित राहील.”
या उपक्रमादरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरूणा पोहरे आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्यांनी या कार्याचं मनापासून कौतुक केलं. हा प्रसंग केवळ एका कुटुंबाचा गौरव नसून, संपूर्ण समाजासाठी प्रेरणा देणारा आहे. वाढदिवस साजरा करण्याची ही एक नवी आणि आश्वासक दिशा म्हणता येईल.