माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
सामाजिक भान जपत,दोन दानशूर व्यक्तींनी सामाजिक कार्यकर्ते संतोष खाडे यांच्या पुढाकारातून माणगाव शहर व तालुक्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या विश्रांतीसाठी सुमारे तीनशेऐंशी किलो वजनाची,सिमेंट-काँक्रिट आणि लोखंडी रॉडपासून बनवलेली, आकर्षक डिझाइनची दहा पार्कसदृश बाकडी बसवून एक परिणामकारक उपक्रम राबवला आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे चार, पोलीस ठाणे येथे दोन, गोरेगाव पोलीस ठाणे येथे दोन आणि नागाव (गोरेगाव) येथे दोन अशा ठिकाणी ही बाकडी बसवण्यात आली आहेत…या उपक्रमामुळे वृद्ध, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी थांबताना विश्रांतीची सुविधा लाभणार आहे.
या उपक्रमाचे प्रत्यक्षदर्शी ठरलेला क्षण आमच्या प्रतिनिधीच्या पाहणीत आला, जेव्हा माणगावच्या बाजारपेठेतून जात असताना उपजिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ संतोष खाडे आणि त्यांचे सहकारी प्रत्येकी तीनशेऐंशी किलो वजनाचे बाकडी बसवण्याचे काम करताना दिसले. संदीप सावंत (एलआयसी विकास अधिकारी) आणि दिपेश पाटोळे (सिव्हिल कंत्राटदार) यांनी दिलेल्या निधीतून या बाकड्यांची उभारणी झाली असून, त्यांचे विशेष उल्लेख करत खाडे यांनी त्यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. “आपल्या विश्वासाला न्याय देत सामाजिक कार्य करत राहीन,” अशी भावनिक प्रतिक्रिया देताना खाडे यांनी या उपक्रमातून ‘सामूहिक सहकार्य आणि सार्वजनिक सेवा’ यांचे उदाहरण घालून दिले आहे. लहान कृतीतूनही समाजात मोठा बदल घडवू शकतो, हे या उपक्रमाने अधोरेखित केले आहे.